| पाताळगंगा | प्रतिनिधी |
पावसाळ्यात रस्त्यांची दुरवस्था होणे हे नित्याचे समिकरण होत चालले आहे. त्यातच लोधीवली, मार्गी वयाल या गावात जाणारा रस्ता पुर्णपणे चिखलामध्ये हरवला की काय, असा प्रश्न सध्या ग्रामस्थांना पडत आहे. त्याच ठिकाणी सेंट जोसेफ शाळा असून विद्यार्थ्यांना येथे येण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. हा रस्ता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या अंतर्गत येत असून, या ठिकाणी वाहने चिखलात अडकून सातत्याने अपघात घडत आहेत. तालुक्यात चांगले रस्ते होण्यासाठी खूप वेळ लागतो. मात्र, तेच रस्ते खोदकाम करण्यासाठी वेळ लागत नाही. त्यामुळे रस्त्यांची अक्षरक्षः चालण झाल्याचे अनेक ठिकाणी पहावयांस मिळत आहे. मात्र, असे असले तरी हा रस्ता केव्हा उत्तम होणार याकडे लक्ष लागले आहे. तोपर्यंत चिखलातून मार्ग काढावे लागणार, असे चित्र या ठिकाणी पहावयास मिळत आहे.







