तुंगी गावाचा रस्ता धोकादायक

पावसात साईडपट्ट्या गेल्या वाहून

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या तुंगी गावाकडे जाणार्‍या रस्त्याचे जून महिन्याच्या सुरुवातीला डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, मागील एक महिन्यातील जेमतेम झालेल्या पावसात या रस्त्याची साईडपट्टी वाहून गेली आहे. तर, रस्त्याच्या खाली दोन ठिकाणी मोठे भगदाड पडले असून रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे.

अंभेरपाडा ग्रामपंचायत मधील उंचावर वसलेल्या तुंगी या गावाला दोन वर्षांपूर्वी कच्चा रस्ता बनविण्यात आला होता. त्यावेळी रस्त्यावर खडीकरण करून स्थानिकांची येण्या-जाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, या रस्त्यावर डांबरीकरण झाले नव्हते. यासाठी स्थानिक आमदारांच्या निधीतून या रस्त्यावर मे महिन्यात खडीकरण करण्यात आले. यानंतर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात डांबरीकरण करण्यात आले होते. जुन महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसात रस्त्याची साईडपट्टीच वाहून गेली होती. त्यानंतर जिल्हा परिषद बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदाराकडून रस्त्याची पुन्हा दुरुस्ती करून घेतली. मात्र, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा या रस्त्यावरील अनेक साईडपट्ट्या वाहून गेल्या आहेत. तर, दोन ठिकाणी रस्त्याच्या खाली मोठे भगदाड पडले असून भाविषयात संपूर्ण रास्तच वाहून जाण्याची शक्यता असल्याचे स्थानिक लोक सांगत आहेत.

Exit mobile version