रस्त्याच्या कडेला खोदले गटार; संपुर्ण रस्ता श्रमदानातून बनविण्याची तयारी
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या तुंगी गावाकडे जाणारा रस्त्याची मे अखेरीस पडलेल्या मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले होते. दीड किलोमीटर लांबीच्या रस्त्याचा काही भाग अनेक ठिकाणी वाहून गेला होता. सार्वजनिक बांधकाम विभाग रस्त्याबाबत कोणत्याही हालचाली करीत नसल्याने अखेर स्थानिक तरुणांनी एकत्र येत श्रमदान करून या रस्त्यावरून वाहत जाणारे पाणी रस्त्याच्या कडेने वळविण्यासाठी गटार खोदण्याचे काम केले आहे. स्थानिक तरुणांच्या या श्रमदानाबद्दल तुंगी ग्रामस्थांनी कौतुक केले असून शासन रस्ता दुरुस्त करणार नसेल तर ग्रामस्थ करतील, अशी भावना व्यक्त करण्यात आली आहे.
डोंगरावर वसलेल्या तुंगी या गावाला 2023 पर्यंत रस्ता नव्हता. या गावात रस्ता नेण्यासाठी वन जमिनीचे प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर रस्ता बनला होता. खासदार बारणे यांच्या प्रयत्नांतून आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून 2024 साली मार्च-एप्रिल या दरम्यान डोंगर पाडा ते तुंगी या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले होते. परंतु, पहिल्याच पावसात रस्त्याचे मोठे नुकसान झाल्याने रस्त्यावरील वाहतूक बंद झाली होती. त्यानंतर पुन्हा नोव्हेंबर 2024 मध्ये तुंगी गावाकडे जाणारा रस्ता बनविण्यात आला होता. मात्र, हाच रस्ता 25-26 मे रोजी झालेल्या अवकाळी आणि पूर्व मान्सूनच्या पावसाळात अनेक भागात वाहून गेला आहे. त्यामुळे या कामाबाबत प्रश्नचिन्हे उपस्थित करण्यात येत आहेत.
डोंगर फोडून बनवलेल्या रस्त्याला बहुसंख्य ठिकाणी मजबूत गटारे बांधण्याची गरज असतानाही ती बनवली गेली नाहीत. रस्ता बनविताना केवळ रस्त्याच्या बाजूने पावसाचे पाणी वाहून जावे यासाठी जेसीबी मशीनने साधे गटार बनविले होते. मात्र, डोंगरातून वाहून येणारे पाणी हे डोंगरातील माती दगड घेऊन रस्त्यावर येत असल्याने रस्ता वाहतुकीस बंद झाला आहे. त्यामुळे तुंगी ग्रामस्थांच हाल होऊ लागले आहेत. याकडे विद्यमान आमदार आणि खासदार यांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.
रस्त्याच्या ज्या-ज्या भागातून पाणी जाते त्या ठिकाणी रस्ता खराब होतो. त्यामुळे पुढील चार महिने रस्ता बंद राहण्यापेक्षा स्थानिक तुंगी गावातील तरुणांनी श्रमदानातून गटार निर्माण केले. त्यामुळे पावसाचे पाणी आता रस्त्यातून न वाहता ते गटारातून वाहत जाऊ शकते. त्याचबरोबर रस्त्यात माती दगड येण्याचे प्रमाण देखील कमी होऊ शकते. त्याचबरोबर लोकनेत्यांकडून रस्ता होत नसेल तर संपुर्ण रस्ता श्रमदानातून बनविण्याची तयारी देखील त्यांनी दाखविली आहे. त्याबाबत स्थानिक तरुणांच्या कार्याबद्दल त्यांचे कौतुक केले आहे.