| रसायनी | प्रतिनिधी |
रसायनी कॉर्नर ते कष्टकरी नगर या रस्त्याची दुरवस्था झाल्याने या रस्त्यावरुन प्रवास करताना नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. जुनी पोसरी, ठाकूरवाडी, कष्टकरी नगर, तुराडे व आसपासच्या गावांतील नागरिक याच रस्त्यावरुन प्रवास करतात. या रस्त्याची दुरवस्था झाल्याने शाळकरी विद्यार्थी, कामगारवर्ग यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. या रस्त्याचे डांबरीकरण अथवा काँक्रिटीकरण व्हावे यासाठी बजरंग दलाचे सुभाष कोकणे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला पत्रव्यवहार करुन दि. 29 एप्रिल रोजी ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला होता. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम खात्याने आंदोलन मागे घेण्यास सांगितले. आणि पाऊस सुरू होण्यापूर्वी काम पूर्ण करून देऊ असे आश्वासन दिले होते. पावसाळाही संपला तरी रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष झाल्याने बजरंग दल आंदोलनाच्या पावित्र्यात आहे. येत्या दहा दिवसांत रसायनी कॉर्नर ते कष्टकरीनगर या रस्त्याचे काम सुरु करुन रस्ता पूर्ण करु, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता मिलिंद कदम यांनी दिले आहे.
रस्त्याचे डांबरीकरण होणार
