| पनवेल | वार्ताहर |
पनवेल तालुक्यातील पेंधर पुलालगत पेंधर रेल्वे फाटकाकडे नागरिक ये-जा करणाऱ्या रस्त्यांवर खड्डे पडले आहे. रात्री अंधारात अनेक दुचाकी चालक पडून अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे सिडको प्रशासनाने सदर रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी येथील रहिवाशांकडून केली जात आहे.
पेंधर रेल्वे फाटक ओलांडून तळोजा फेज-2 या वसाहतीत प्रवेश करताच सिडकोकडून पेंधर पुलाच्या दोन्ही बाजुने असलेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. गेल्या वर्षभरात फेज-2 मध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आले आहेत. त्यामुळे बहुतांश नागरिकांना पनवेल आणि नवी मुंबई परिसरात नोकरी तसेच कामानिमित्त जाताना खड्डेमय रस्त्यावरुनच जावे लागत आहे. पुलाच्या दोन्ही बाजुचा रस्ता खड्डेमय बनला आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी पथदिवे बंद असल्यामुळे खड्डयात पडून दुचाकी चालक जखमी झाल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे तळोजातील रहिवाशांनी पनवेल महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सदर खड्डेमय रस्त्याची माहिती दिली असता, सदर काम सिडकोचे असल्यामुळे सिडको अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, सिडकोचे विभागीय कार्यालय कळंबोली येथे असल्यामुळे तसेच परिसरात अधिकारी फिरकत नसल्यामुळे कोणत्या अधिकाऱ्याकडे संपर्क साधावा? असा प्रश्न तळोजा फेज-2 मधील नागरिकांना पडला आहे. दरम्यान, पेंधर पुलाचे काम पाहणाऱ्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, दोन दिवसात सदरचा रस्ता दुरुस्त केला जाईल, असे त्यांनी सांगितले.