आठवडा उलटूनही पोलिसांच्या हाती अपयश
| सुधागड-पाली | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यातील हातोंड, गोंदाव आणि माठळ या गावांमध्ये शनिवारी (दि.26) रात्री पावणेदोन ते रविवारी (दि.27) पहाटे सव्वातीन वाजताच्या दरम्यान 4 ते 5 जणांच्या सशस्त्र टोळीने धुमाकूळ घालत घरांवर दरोडे टाकले. मात्र, आठवडा उलटून गेला तरी हे दरोडेखोर अजूनही मोकाटच आहेत. येथील एका फार्म हाऊसच्या सीसीटीव्ही मध्ये 5 संशयित दिसले आहेत. मात्र, अजूनही हे संशयित पोलिसांना सापडलेले नाहीत.
गोंदाव, हातोंड आणि माठळ या गावांमध्ये सशस्त्र दरोडेखोरांनी एकामागून एक घरांना लक्ष्य केले. गोंदाव येथील एका घरात चोरी करून दरोडेखोरांनी हातोंड गाव गाठले. या टोळीने घरातील लोकांच्या गळ्यावर कोयता ठेवत आणि तलवारीचा धाक दाखवत लूटमार केली. या टोळीने कोयता व तलवारसदृश्य शस्त्रांचा धाक दाखवत घरातील सोने, रोकड असा मौल्यवान ऐवज लंपास केला. यावेळी सर्व घरांतील मिळून 1 लाख रुपयांचे सोने व जवळपास 60 हजार रुपयांची रोकड व मोबाईल लुटून हे दरोडेखोर पसार झाले. यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये भीती व दहशतीचे वातावरण आहे.
पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. मात्र, अजूनही पोलिसांना ठोस धागेदोरे हाती लागलेले नाहीत. येथील एका फार्म हाऊसमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये पाच संशयित लोक कैद झाले आहेत. त्या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत. मात्र, कॅमेऱ्यात कैद झालेले हे लोक नक्की कोणत्या बाजूला गेले हे मात्र पोलिसांना कळलेले नाही. दरम्यान, पालीचे पोलीस निरीक्षक हेमलता शेरेकर यांनी सांगितले की, पोलिसांचा तपास सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेल्या संशयीतांची कोणाला माहिती असेल तर ताबडतोब त्यांनी पोलिसांना कळवावे. सुधागड तालुक्यात व पाली शहरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची संख्या कमी आहे. त्यामुळे दरोडेखोर नक्की कोणत्या बाजूला गेले आहेत हे समजेलेले नाही. आपल्या आजूबाजूला अशाप्रकारे कोणी संशयित निदर्शनास आल्यास ताबडतोब पोलिसांना कळवावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.







