। अलिबाग । वार्ताहर ।
मुंबईसह कोकण किनारपट्टीवरील 21 विधानसभा मतदार संघात मच्छिमार सेनेची भूमिका अत्यंत निर्णायक ठरणार असल्याचे ठाम प्रतिपादन महाराष्ट्र मच्छिमार सेनेचे मुख्य संघटक संतोष हरिभाऊ पाटील, मंगेश पद्माकर कोळी यांनी केले आहे.
प्राचीन काळापासून कोकण किनारपट्टीवर आदिवासी कोळी जमातीचे वास्तव्य आहे. मुंबई, पालघरसह रायगड जिल्हयांत पनवेल, उरण, अलिबाग, श्रीवर्धन या विधानसभा मतदारसंघात तर कोळी जमातीचे लहान मोठे अनेक कोळीवाडे आहेत. ज्यांतील मतदार संख्या अत्यंत निर्णायक स्वरूपाची आहे. मुंबई शहर आणि उपनगरांतील 36 विधानसभा मतदार संघातून निम्म्या मतदार संघात परप्रांतीय निवडून येतात. रायगड, रत्नागिरी, जिल्हयांत या परिस्थीतीची नांदी ऐकू येवू लागली आहे. कोकणात त्याच्याच भूमित विस्थापीत होईल, असा गंभीर इशारा महाराष्ट्र मच्छिमार सेनेच्या कार्यकारीणी बैठकीत बोलताना मुख्य संघटक संतोष हरिभाऊ पाटील यांनी दिला आहे.
कोकण किनारपट्टीवरील मुंबई शहरासह ठाणे, पालघर, रायगड जिल्हयांतील अलिबाग, उरण, पनवेल, श्रीवर्धन व रत्नागिरी या विधानसभा मतदार संघात आमची मतदार संख्या लक्षणीय आहे. यापैकी काही विधानसभा मतदार संघातून कोळी जमातीचे उमेदवार द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र मच्छिमार सेनेच्या तर्फे महाराष्ट्रातील विद्यमान राजकीय पक्षांना केली गेली आहे. कोळी जमातीला प्रतिनिधीत्व न दिल्यास महाराष्ट्र मच्छिमार सेना स्वतः आपले उमेदवार विधानसभा रिंगणात उतरणार असल्याचे महाराष्ट्र मच्छिमार सेनेचे मुख्य संघटक मंगेश पद्माकर कोळी, संतोष हरिभाऊ पाटील यांनी प्रतिपादित केले आहे.