अद्याप कोणताही निर्णय नाही
। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत आणि खालापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुरेश लाड यांनी पक्षाच्या जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. पक्षाचे प्रदेश अध्यक्ष यांचा दौरा अर्धवट टाकून निघून गेलेले लाड यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. पक्षातील कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच निर्णय घेणार असल्याचे विश्वसनीय सुत्रांकडून सांगण्यात येत आहे, मात्र त्यांच्याकडून कोणत्याही महमंडळावर नियुक्ती करण्याची मागणी नव्हती असे ठामपणे सांगितले जात असल्याने लाड यांची पक्षावर नाराजी कोणती आणि कशासाठी? या प्रश्नाने जिल्ह्याला विचार मंथन करायला भाग पाडले आहे.
11 एप्रिल रोजी आपण न मागितलेले परंतु पक्षाकडून देऊ केलेले महामंडळ आपल्या भागातील कार्यकर्त्याला मिळावे म्हणून उरण येथील परिवार संवाद सभेत भाषणबाजी झाली. त्यावेळी भाषण करणार्या पक्षाच्या पदाधिकार्यांना प्रदेश अध्यक्ष आणि राष्ट्रीय सरचिटणीस यांनी आवर घातली नाही.ही खंत मनात ठेवून सभेतून निघालेले पक्षाचे जिल्हा अध्यक्ष लाड यांनी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या तीन दिवसीय दौर्यातून पहिल्याच दिवशी काढता पाय घेतला होता.त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून सुरेश लाड हे महामंडळ मिळत नसल्याने नाराज आहेत तसेच अन्य पक्षात जाण्याची तयारी केली आहे अशी चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. 12 एप्रिल रोजी रात्री घरी परतलेले सुरेश लाड हे त्या दिवसापासून घरीच असून त्यांना भेटायला कार्यकर्त्यांची रीघ लागली आहे. मात्र 11 एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कर्जत येथील सभेत लाड यांना पहिल्याच यादीत महामंडळ देऊन त्या महामंडळाचे अध्यक्ष पद त्यांना दिले जाण्याचा निर्णय पक्षाने घेतला असल्याची जाहीर कबुली सुनील तटकरे आणि जयंत पाटील यांनी दिली होती. मात्र त्यानंतर लाड लवकरच पक्ष सोडणार?अशा वावड्या उठल्या असून अफवांचे पीक कर्जत तालुक्यात आले आहे.
मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोटातून आणि विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लाड हे महामंडळ मिळत नाही म्हणून नाराज नाहीत असे सांगण्यात येत आहे. पक्षाला त्यांनी जिल्ह्यातील काही राजकीय विषय आणि पक्षवाढीसाठी आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तता याबाबत आपले मत पक्षाकडे पाठवले आहे. मात्र तीन पक्षाच्या आघाडीचे सरकार यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला दुखावून काही करायला पुढे येत नाही.त्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते आणखी मागे जात असून पक्ष टिकवून ठेवायचा असेल तर कार्यकर्त्यांनी सुचवलेली कामे व्हायला हवी आणि ती कामे मागे ठेवली जात असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष लाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुरेश लाड यांची नाराजी ही महामंडळ मिळत नाही म्हणून नाही तर पक्षाच्या कार्यकर्त्यांची कामे होत नसल्याने ते नाराज असल्याचे सांगितले जात आहे.