नागांवमध्ये राज्यस्तरीय कबड्डी पंच परीक्षा
। अलिबाग । प्रतिनिधी ।
महाराष्ट्रात कबड्डीला विशेष महत्व आहे. लालमातीतील या खेळाला रायगडच्या भूमीने मोठा नावलौकिक मिळवून दिला आहे. आजपर्यंत राज्य, राष्ट्रीय स्तरावर रायगडातील खेळाडूंनीही नांव कमावले आहे. खेळाडूंबरोबरच या खेळात पंचांचीही भूमिका मोलाची असल्याने पंच परीक्षेत उत्तीर्ण होणार्या परीक्षार्थींनी निष्पक्षपणे पंचांची भूमिका निभावावी, असे प्रतिपादन राज्य कबड्डी संघटनेचे सरकार्यवाही अॅड.आस्वाद पाटील यांनी रविवारी केले.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन रायगड व रायगड कबड्डी असोसिएशन यांंच्या विद्यमानाने तसेच निखिल मयेकर मित्रमंडळ नागांव तर्फे रविवारी (दि.25) सकाळी 9 वाजता संचालक मंडळ हायस्कुल नागांव अलिबाग येथे राज्यस्तरीय कबड्डी पंच परीक्षा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते उपस्थितांसमोर बोलत होते.
नागांवचे माजी सरपंच नंदकुमार मयेकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमास माजी जि.प.सदस्य संजय पाटील, नागांव सरपंच निखिल मयेकर, नागांव हायस्कूलचे कार्याध्यक्ष एम.एन. पाटील, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य हेमंत राऊळ आदि मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास पिंपळे यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पंच परीक्षेस बसलेल्या सर्व उमेदवारांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.