तरुणाईमध्ये उत्साह, बाजारपेठा सजल्या
| पाली/बेणसे । वार्ताहर ।
सलग दोन वर्ष नवरात्रौत्सवावर शासकीय निर्बंध होते. सर्वत्र नैराश्य व बंधनमुक्त वातावरणात सर्वांचा जीव गुदमरला होता. मात्र यावर्षी सण व उत्सव साजरे करण्यास मोकळीक मिळाली आहे. निर्बंधच रद्द करण्यात आल्याने मंडळांना नवरात्रौत्सवाचे वेध लागले आहेत. मंडळांकडून जय्यत तयारी सुरू आहे. दोन वर्षानंतर गरबा घुमणार असल्याने तरुणाईंमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
गरबा, दांडियासाठी परवानगी दिली असल्याने विविध मंडळे, राजकीय पक्षांकडून दांडिया नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. राजकीय पक्षांमध्ये चुरस निर्माण झाल्याने बक्षिसांच्या रकमेत चढाओढ सुरू झाली आहे. पाली सुधागडसह जिल्ह्यातील सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाची तयारी सुरू झाली आहे. मंडप उभारण्याचे काम सुरू झाले आहे. मूर्तीकारही देवीच्या वेगवेगळ्या आकाराच्या सुबक व रेखीव मूर्ती घडविण्याच्या कामात व्यस्त आहेत. अवघे काही तास शिल्लक राहिल्याने भाविकांचाही उत्साह वाढला आहे. बाजारपेठा नवरात्र उत्सवासाठी लागणार्या साहित्याने गजबजल्या आहेत. पावसाने उघडीक केल्याने लोक खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. नवरात्रोत्सवाची पालीतील श्री अंबिका माता मंदिरात जय्यत तयारी सुरू झाली आहे. तसेच सुधागड किल्ल्यावरील श्री भोराई देवीचा नवरात्रोत्सव यंदा उत्साहात व विविध धार्मिक उपक्रम राबवून मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे.
दांडिया स्पर्धेतील बक्षिसे मिळविण्यासाठी दांडिया गृपची तयारी सुरू आहे. दांडियासाठी फॅन्सी दांडिया, विशेष कपडे, त्यावर सुसंगत ज्वेलरी बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. दांडिया स्पर्धेसाठी खास ऑर्केस्ट्रा, गायक, वाद्यवृंदासाठी आधीच बुकींग सुरू आहे. पावसामुळे उत्सवावर विघ्न येऊ नये यासाठी वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात येत आहेत. एकूणच यंदाच्या नवरात्रोत्सवात प्रचंड उत्साह, जोश, जल्लोष असा धूम मचवणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.