जेएनपीटी वसाहतीत इमारतीचे छत कोसळले

रहिवासी थोडक्यात बचावले
। उरण । वार्ताहर ।

जेएनपीटी बंदराच्या वसाहतीमधील एका इमारतीचे छत कोसळल्याची दुर्घटना सेक्टर 1 बिल्डिंग 70 बी मधील गुरुवारी (दि.14) सकाळच्या सुमारास घडली. घरातील रहिवाशांच्या प्रसंग सावधानतेमुळे रहिवासी थोडक्यात बचावले असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे धोकादायक इमारतींचा प्रश्‍न पुन्हा एकदा उभा ठाकला आहे.
जेएनपीटी बंदराच्या प्रशासनाने जसखार ग्रामपंचायत हद्दीत कामगारांसाठी सुसज्ज वसाहतीची उभारणी केली आहे. या वसाहतीमधिल इमारतीची दुरवस्था झाल्याने बंदर प्रशासनाने मागील दोन वर्षांपूर्वी सुमारे 150 कोटी रुपयांचा निधी दुरुस्तीसाठी खर्च केला आला. परंतु, या इमारतीचे नव्याने करण्यात येत असलेले दुरुस्तीचे काम हे निकृष्ट दर्जाचे झाल्याने रहिवाशांच्या फ्लॅटमध्ये काही दिवसातच पावसाचे पाणी झिरपू लागले. तसेच काही इमारतींमधील फ्लॅटच्या बांधकामाची पडझड सुरू झाली आहे. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते व रहिवाशांनी बंदर प्रशासनाकडे तक्रार दाखल करुन वसाहतीमधील इमारतीचे पुन्हा स्ट्रक्चरल ऑडिट करावे, अशी मागणी केली. परंतु, बंदर प्रशासनाच्या भ्रष्ट कारभारामुळे रहिवाशांना वसाहतीत उद्भवणार्‍या समस्यांचा सामना करत आपापल्या कुटुंबासह राहण्याची नामुष्की ओढवली आहे.

Exit mobile version