| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन नगरपालिकेची निवडणूक मोठ्या गाजावाजात पार पडली. प्रचारसभांमध्ये शहराचा कायापालट करू, विकासाचा नवा अध्याय सुरू करू, असे दमदार आश्वासन देणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आता सत्तेचा महिना उलटून गेला तरी साधी स्थायी समितीही स्थापन करता आलेली नाही. त्यामुळे नगरपालिकेचा कारभार अक्षरशः ठप्प झाल्याचे चित्र आहे.
सत्तेसाठी एकत्र आलेल्या लोकप्रतिनिधींमध्ये अंतर्गत वाद, गटबाजी आणि खुर्चीसाठी सुरू असलेली चढाओढ यामुळे महत्त्वाचे निर्णय प्रलंबित राहिले आहेत. शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. निवडणुकीपूर्वी शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, पर्यटन विकास, फेरीवाल्यांचे पुनर्वसन, समुद्रकिनाऱ्यावरील अनधिकृत बांधकामे, वाहतूक कोंडी यावर ठोस उपाययोजना करण्याची ग्वाही देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती जैसे थेच आहे.
शहरातील अनेक रस्त्यांची अवस्था दयनीय, खड्ड्यांचे साम्राज्य, पावसाळ्यापूर्वी गटारसफाई अपुरी, भटक्या कुत्र्यांचा व मोकाट जनावरांचा वाढता त्रास, फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे बाजारपेठेत वाहतुकीची कोंडी, पर्यटन विकासासाठी कोणतीही ठोस कार्यवाही नाही. या सर्व गंभीर विषयांवर सत्ताधाऱ्यांकडून ठोस भूमिका दिसत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
स्थायी समिती ही नगरपालिकेचा कणा मानली जाते. आर्थिक तरतुदी, विकासकामांना मंजुरी, निविदा प्रक्रिया यासाठी ही समिती अत्यावश्यक असते. मात्र सत्ताधाऱ्यांच्या अंतर्गत राजकारणामुळे तिची स्थापना रखडली आहे.नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि काही नगरसेवक यांच्यातील कोण मोठे? या सत्तासंघर्षामुळे शहर विकासाचे काम थांबले आहे, अशी टीका विरोधकांनी केली आहे.
श्रीवर्धनमध्ये सत्ताधाऱ्यांचा कारभार ठप्प
