जिल्ह्यातील महिलांची सुरक्षा धोक्यात; गतवर्षी अत्याचाराचे 147 गुन्हे दाखल

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे कितीही कडक झाले असले तरी, अत्याचाराचे प्रमाण कमी झालेले नाही. रायगड जिल्ह्यात 2021 या वर्षभरामध्ये 147 महिला अत्याचाराचे गुन्हे घडले आहेत. वर्षअखेरीस तर महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. ही बाब गंभीर असून, यावरुन जिल्ह्यात महिला असुरक्षित असल्याचेच स्पष्ट होते.
जिल्ह्यात 2021 वर्षामध्ये महिला अत्याचाराचे 147 गुन्हे दाखल असून, त्यापैकी 141 गुन्हे उघडकीस आले. त्या गुन्ह्यातील अटक आरोपींविरुद्ध विहीत वेळेत दोषारोपपत्र संबंधित न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत. रायगड पोलीस दलाच्या हद्दील 2021 मध्ये 2 हजार 254 गुन्ह्यांची नोंद झाली होती. 2020 च्या तुलनेत दाखल गुन्ह्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली असली तरी गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचे प्रमाण मात्र वाढले आहे. वर्षभरात यात जिल्ह्यात 38 खून, 20 खूनाचे प्रयत्न, 1 दरोडे, 23 जबरी चोर्‍यांची नोंद झाली आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये तर वाढच झाली आहे. रायगड पोलीस दलाच्या हद्दीत वर्षभरात 57 बलात्कार आणि 81 विनयभंगाचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. 2020 च्या तुलनेत हे प्रमाण कमी असले तरी घडलेले गुन्हे चिंताजनकच आहेत. सरत्या वर्षात महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे गाजले. त्यात महाड तालुक्यातील महिला सरपंचावरील अत्याचार ही घटना जिल्ह्याला हादरवून टाकणारीच होती. नेरळमधील पर्यटक महिलेचा शिरच्छेददेखील थरकाप उडविणाारी घटना म्हणून नोंद झाली आहे. अशा अनेक घटना गेल्या काही महिन्यात घडल्या आहेत. रायगड पोलिसांनी या सर्व अपराधांचा तपासदेखील शिघ्रगतीने लावून आरोपींच्या मुसक्या वळल्या आहेत. तरीदेखील अशा घडू नयेत यासाठीदेखील प्रयत्न होणे गरजेचे आहे.


चालू वर्षात महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचार रोखण्याच्या दृष्टीकोनातून रायगड पोलिसांना अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत. दामिनी पथक, गस्ती पथकांची कार्यक्षमता वाढवण्याबरोबरच शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रबोधनात्मक जनजागृती करणेही गरजेचे आहे. खून, दरोडे, घरफोड्यांसारखे गंभीर गुन्हे रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर द्यावा लागणार आहे. तर, चोर्‍या आणि घरफोड्यांच्या प्रकरणांची उकल करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे लागणार आहे. वाढत्या नागरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे रायगड जिल्ह्यात स्थलांतरणाचे प्रमाण वाढले आहे. परराज्यातून जिल्ह्यात दाखल होणार्‍यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे गुन्हेगारी दृष्टीकोनातून आजवर शांत मानला जाणारा हा जिल्हा आता अशांत होण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे आगामी काळात पोलीसांना गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण रोखण्यासाठी व्यापक उपाययोजना आणि प्रतिबंधात्मक कारवाई करण्यावर भर द्यावा लागणार आहे.

महिला अत्याचाराच्या कारण मिमांसा पाहता काही घटना ह्या जवळच्या नाते संबंधातून झाल्याचे समोर आले आहे. मात्र अशा किंवा इतरही घटनांना प्रतिबंधीत करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने जाण्यायेण्याचे रस्ते, शाळा महाविद्यालय, अशा परिसरात छेडखानी होऊ नये यासाठी साध्या वेषातील पोलिस कर्मचारी, दामिनी पथक, गस्त वाढवून जनजागृतीचे काम करीत आहोत. – अशोक दुधे, जिल्हा पोलिस अधिक्षक

Exit mobile version