जिल्ह्यात 16 भरारी पथकांची स्थापना
| आगरदांडा मुरुड | प्रतिनिधी |
खरीप हंगाम जवळ येत असल्याने शेतकर्यांना निविष्ठा वेळेवर उपलब्ध व्हाव्यात म्हणून कृषी विभागाने तयारी सुरू केली आहे. खरीप हंगामात बोगस बियाण्याची विक्री होऊ नये याकरिता रायगड जिल्हा स्तरावर एक व प्रत्येक तालुका स्तरावर एक असे एकूण 16 भरारी पथके तयार केलेली असून या पथकांमार्फत बोगस बियाणे विक्रीला आळा घालण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी उज्वला बाणखेले यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.
बियाणे, खते व कीटकनाशकांचा गुणवत्ता युक्त पुरवठा होण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरावर सनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षामध्ये जी.आर मुरकुटे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक (9503175934) व मिलिंद चौधरी, मोहीम अधिकारी जिल्हा परिषद रायगड (8983511359) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच तालुकास्तरावर एक तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली आहे. तालुका कृषी अधिकारी या समितीचे सदस्य सचिव आहेत. खरीप हंगामात बोगस बियाणे विक्री होऊ नये याकरिता भरारी पथकामार्फत बोगस बियाणे विक्रीला आळा घालण्यात येणार आहे, यामुळे शेतकर्यांची फसवणूक टळेल व अनधिकृत रित्या विक्री होणार्या बोगस बियाणे व खते विक्रीला लगाम घालण्यास मदत होईल. खरीप हंगाम सुरू झाल्यानंतर खाते व बियाणे यांच्या खरेदीसाठी शेतकर्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या कालावधीत शेतकर्यांची फसवणूक होऊ नये म्हणून शेतकर्यांनी गुणवत्ता व दर्जाची हमी देणार्या अधिकृत विक्रेत्याकडूनच बियाणे खरेदी करावेत, बियाणे खरेदी करताना पक्की पावती घेण्यात यावी, बियाणे खरेदीची पावती व बियाण्यांच्या बॅगवरील टॅग व लॉट नंबर शेतकर्यानी पडताळून पहावे व सदर बॅग फोडताना खालच्या बाजूने फोडावी म्हणजे वरील बाजूचा टॅग बॅगेला तसाच राहील. बियाण्यांची फोडलेली पिशवी टॅगसहीत पिकाची काढणी होईपर्यंत जपून ठेवावी म्हणजे बियाणे उगवणी संदर्भात काही तक्रार आल्यास तक्रार दाखल करता येते. तसेच कीटकनाशके व तणनाशके खरेदी करताना त्यांची अंतिम मुदत तपासून घ्यावी, गाडीवरून खते विक्री करणार्या फ्लाय सेलर्स कडून खत खरेदी करू नये, कुठे असे फ्लाय सेलर्स आढळल्यास तात्काळ 9503175934 या संपर्क क्रमांकावर कळवावे, कोणी खत विक्रेता जास्त दराने युरिया सारख्या अनुदानित खताची विक्री करत असेल तर याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय अलिबाग अथवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयास लेखी तक्रार करावी. जिल्ह्यांत विक्री केंद्रावर बियाणे व खते यांचा साठा व गुणवत्ता तपासणे, गोडावून तपासणी, ई पॉस मशीन वरील साठा, शंकास्पद असणारे बियाणे यांचे नमुने घेणे, खतांचे नमुने घेणे, संपूर्ण निविष्ठा विक्रेत्यांच्या दुकानांची तपासणी इत्यादी बाबींवर जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक जी आर मुरकुटे यांची करडी नजर असणार आहे. दोषी आढळल्यास दुकानाचे परवाने निलंबित करून कडक कार्यवाही करण्याचे सूचित केले आहे.
जिल्ह्यात खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी मुबलक प्रमाणात बियाणे व खते शेतकर्यांना कशी मिळतील यासाठी रायगड जिल्ह्याच्या जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी उज्वला बाणखेले यांनी तालुकास्तरावर सूक्ष्म नियोजन केले आहे तसेच शेतकर्यांची फसवणूक करताना कोणी आढळल्यास भरारी पथकाच्या माध्यमातून अचानक धाडी घालून वेळोवेळी तपासण्या केल्या जातील त्यामुळे शेतकर्यांनी घाबरून जाऊ नये तसेच जिल्ह्यात मुबलक प्रमाणात निविष्ठा उपलब्ध होतील अशी माहिती देण्यात आली आहे.







