माथेरानमधील महत्वकांक्षी प्रकल्प, महागडी इलेक्ट्रिनिक उपकरण धूळीत
| माथेरान । वार्ताहर ।
माथेरानमधील महत्वकांक्षी प्रकल्प म्हणून नावारूपाला आलेल्या आकाशगंगा प्रकल्पाला ग्रहण लागल्याचे चित्र आहे. करोडो रुपये खर्चून बनविलेला प्रकल्प गेली तीन ते चार वर्षे बंद आहे. ज्या प्रमाणे 38 पॉईंट हे येथे येणार्या पर्यटकांचे आकर्षण आहे त्याप्रमाणे आकाशगंगा देखील खगोल शास्त्रातील अभ्यासक आणि पर्यटक यांच्यासाठी सुद्धा अति महत्वाचा आहे. हा आकाशगंगा प्रकल्प बंद अवस्थेत असल्यामुळे यावर खर्च केलेले पैसे पाण्यात गेले की काय असा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडला आहे.
माथेरान हे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ आहे. प्रदूषण मुक्त म्हणून माथेरानची ख्याती सर्वदूर पसरली आहे. 38 पॉईंट खेरीज पर्यटकांना विरंगुळा मिळावा आणि त्या विरंगुळ्यातून अभ्यास शिकता यावा या उद्देशाने माथेरानमध्ये आकाशगंगा प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. यामध्ये आकाशातील तारे, ग्रह, धूमकेतू, उल्का अवकाशात होणारे बदल याविषयी माहिती दिली जायची, ती पाहिल्या नंतर वातानुकूलित सिनेमागृहात बसून थ्री-डी थिएटरमध्ये खगोलीय माहितीपट पहावयास मिळत होता आणि ते पाहिल्यानंतर याच टेरेसवर मोठमोठ्या टेलिस्कोपमधून अवकाशातील तारे, ग्रह तसेच इतर ही पहावयास मिळत होते. प्रसिद्ध खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांच्या अथक प्रयत्नातून हा प्रकल्प तत्कालीन नगराध्यक्ष अजय सावंत यांच्या कालावधीत उभा राहिला होता.येथे भेट द्यायला आलेल्या पर्यटकांनी खगोलीय बदल अनुभवले. तत्कालीन जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी त्यांच्या परिवारासह उल्कापातीचा थरार येथूनच अनुभवला होता.
पर्यटकांना आवडता असा हा प्रकल्प गेली तीन वर्षे धूळ खात बंद अवस्थेत पडला आहे. सुरक्षा कठडे रेलिंग यांना गंज लागून ते तुटण्याच्या अवस्थेत आहेत. व प्रवेशद्वार तर कुलुपासह गंजून गेले आहे. सिनेमगृहाचे दरवाजे देखील तुटले आहेत त्यामुळे ते उघडतपण नाहीत, सिनेमागृहात उंदराचे साम्राज्य दिसून येत आहेत. अनेक महागडी इलेक्ट्रिनिक उपकरण धूळ खात पडली आहेत त्यामुळे ती सुरू आहेत की बंद आहेत हे देखील राम भरोसे, मोठमोठी दुर्बिणी निपचित पडलेल्या दिसत आहेत. मात्र याकडे माथेरान नगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष दिसून येत आहे.सुमारे दीड कोटी रुपये खर्च केलेला हा प्रकल्प आज बंद असल्यामुळे अनेकांनी तीव्र भावना प्रकट केल्या आहेत.
आकाशगंगा प्रकल्प सुरू झाल्यापासून माथेरान मधील पर्यटन वाढले होते पर्यटक या प्रकल्पाला अवश्य भेट देत होते.खगोलीय अभ्यासक सुद्धा माथेरान मध्ये येत होते. पण तीन वर्षांपासून हा प्रकल्प बंद असल्यामुळे काही प्रमाणात खगोल अभ्यासक येथे येण बंद झाले आहेत.पण पालिकेला याचं काही सोयरसुतक नाही.पर्यटनवाढीसाठी हा प्रकल्प सुरू होणे गरजेचे आहे
-पवन गडवीर,
स्थानिक रहिवासी
आकाशगंगा अवकाश केंद्र हा प्रकल्प सुरू होता. त्यावेळेस पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देत होते.माझ्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात मीसुद्धा सतत या प्रकल्पाला भेट देत होते.कोरोना काळात हा प्रकल्प बंद केला गेला त्यानंतर पालिकेमध्ये प्रशासक राज्य लागले व प्रशासकाकडून कोणतेही काम झाले नसून अजूनही हा प्रकल्प धूळ खात पडला आहे.