रायगडाचे पावित्र्य धोक्यात!

गडावर सापडल्या 50 हून अधिक दारूच्या बाटल्या

| महाड | प्रतिनिधी |

हिंदवी स्वराज्याची राजधानी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक रायगड किल्ल्यावर तब्बल 50 हून अधिक दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्याने शिवप्रेमी, इतिहास अभ्यासक आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. गडावरील विविध भागांत वाढती अस्वच्छता, प्लास्टिक कचरा आणि मद्यपानाचे प्रकार समोर आल्याने रायगडाचे पावित्र्य नेमके कोण राखणार? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात पायदळ प्रमुख म्हणून कार्य केलेल्या सरनोबत पिलाजीराव गोळे यांचे पंधरावे वंशज लौकिक गोळे यांनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत राज्य शासन आणि पुरातत्त्व विभागाला थेट जाब विचारला आहे.

माहितीनुसार, रायगड किल्ला परिसरातील एमटीडीसीच्या खोल्यांजवळ, राणी वसाच्या मागील भागात तसेच गडावरील इतर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या, प्लास्टिक कचरा आणि अस्वच्छता आढळून आली. शिवरायांच्या स्मृतींशी जोडलेल्या पवित्र स्थळी असे प्रकार उघड झाल्याने शिवभक्तांमध्ये संताप व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिक आणि इतिहासप्रेमींच्या मते, गडावरील सुरक्षा व्यवस्था अत्यंत अपुरी पडत असून, प्रवेशद्वारांवर काटेकोर तपासणी होत नसल्याने पर्यटकांकडून मद्याच्या बाटल्या सहजपणे गडावर नेल्या जात आहेत. इतिहासाचा अभिमान सांगणाऱ्या गडावरच अशा प्रकारे पावित्र्याची विटंबना होत असेल, तर प्रशासन नेमके काय करत आहे? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. लौकिक गोळे यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचे पावित्र्य जपणे ही शासनाची आणि समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. गडावर सुरू असलेल्या प्रकारांकडे दुर्लक्ष करणे अत्यंत दुर्दैवी आहे.

शिवप्रेमींनी गडावर तातडीने कडक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. त्यामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा वाढवणे, सुरक्षारक्षकांची संख्या वाढवणे, प्रवेशद्वारांवर कडक तपासणी करणे, दारूबंदीचे स्पष्ट फलक लावणे आणि नियम तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे यांचा समावेश आहे. इतिहास, संस्कृती आणि स्वराज्याच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या रायगड किल्ला वर घडलेल्या या प्रकारामुळे आता पुरातत्त्व विभाग आणि प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिवरायांच्या राजधानीचे पावित्र्य वाचवण्यासाठी प्रशासन तातडीने कठोर पावले उचलणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर दारूच्या बाटल्या सापडणे ही अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक बाब आहे. गडावर अशा घटना घडत असताना पुरातत्त्व विभाग आणि प्रशासन नेमके काय करत आहे, हा मोठा प्रश्न आहे. रायगडाचे पावित्र्य जपण्यासाठी तातडीने कडक सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही यंत्रणा आणि कठोर कारवाईची गरज आहे. शिवरायांच्या राजधानीची विटंबना कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही.

लौकिक गोळे
Exit mobile version