दि ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन (इंडिया) च्या 45 अंधांची रायगड सफर
। महाड । प्रतिनिधी ।
दि ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन (इंडिया) व रोटरी क्लब ऑफ महाड यांच्या संयुक्त विद्यमाने या संस्थेच्या 45 सभासदांना रायगड किल्ला व रायगड किल्ल्याचा इतिहास हे स्पर्श ज्ञानाने जाणून घेण्यासाठी रायगड सफर घडवून आणली. यावेळी सर्व सभासदांचे रोटरी क्लब अध्यक्ष व सेक्रेटरी यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
दि ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन (इंडिया) या संस्थेचे अध्यक्ष अरुण भारस्कर यांनी सर्व रोटरी सभासदांचे अभिनंदन केले व रोटरी कार्याचे कौतुक केले. सर्व अंध व्यक्तींना रोटरी क्लब क्लब ऑफ महाडतर्फे रायगड किल्ल्याचा इतिहास व रायगड किल्ला परिसर प्रत्यक्ष रायगड किल्ल्यावर रोप वेने प्रवास करून गडावर नेऊन दाखविण्यात आला.
इतिहास अभ्यासक राजू गायकवाड यांनी यावेळी मार्गदर्शन केले. रायगड किल्ला अभ्यासक राजू गायकवाड यांनी आपले बहुमूल्य मार्गदर्शन करून प्रत्यक्ष रायगड फिरवून इतिहासाची माहिती दिली. सर्व अंध व्यक्तींना यावेळी त्यांनी स्पर्शज्ञानाने रायगडाचे दर्शन घडवून आणले.
यावेळी रोटरी क्लब ऑफ महाड या संस्थेने आलेल्या सर्व अंध व्यक्तींची राहण्याची व जेवणाची उत्तम सुविधा हॉटेल यात्री रघुवीर देशमुख यांच्या हॉटेलमध्ये केली होती. सर्वांची उत्तम प्रकारे काळजी घेऊन त्यांना अशक्य असलेले प्रत्यक्ष रायगड दर्शन घडवून आणले. या प्रोजेक्टसाठी रोटरी क्लब अध्यक्ष अरुण गावडे व सेक्रेटरी सुधीर मांडवकर तसेच रो जगदीश भानुशाली व कोमल भानुशाली यांनी हा प्रोजेक्ट यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत घेतली व या आलेल्या सर्व व्यक्तींचे रायगड दर्शनाचे स्वप्न प्रत्यक्षात सत्यात उतरवले.