। तळा । श्रीकांत नांदगावकर ।
रायगड जिल्ह्याला जवळपास 20 वर्षानंतर एकाचवेळी दोन मंत्रिपद मिळाल्याने जिल्ह्याच्या विकासाचा अनुशेष भरून निघण्याची आशा पल्लवीत झाली आहे. मात्र, जिल्ह्यातील स्थलांतर रोखण्याचे आव्हान या दोन मंत्र्यांसमोर आहे. रायगड जिल्ह्यात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. मात्र, हवामानाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसायही धोक्यात येत चालला आहे. त्यातच रायगडमध्ये चांगली शिक्षण व्यवस्था, आरोग्य सुविधा नाही. जिल्ह्यातील औद्योगिक विकास खुंटलेला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोक स्थलांतर करुन पोटापाण्यासाठी शहरात जात आहेत. नव्याने मंत्रिमंडळात समावेश झालेले दोन कॅबिनेट मंत्री जिल्ह्यातील हे स्थलांतर रोखतील का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणात रायगड जिल्ह्याचा दबदबा होता. दिवंगत बॅ.ए.आर. अंतुले, मनोहर जोशी असे दोन मुख्यमंत्री या जिल्ह्याने राज्याला दिले आहेत. या जिल्ह्यातील नेत्यांनी अन्न नागरी पुरवठा, पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य व्यवसाय, जलसंपदा, ऊर्जा, अर्थ विभाग, उद्योग, महिला बालकल्याण आदी महत्वाची खाती सांभाळली आहेत. त्या तुलनेत रायगड जिल्ह्याचा विकास मात्र झाला नसल्याची खंत येथील जनतेस आहे. 2004 पासून श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व तटकरे परिवाराकडे आहे. खा. सुनिल तटकरे यांच्या कन्या ना. अदिती तटकरे या मतदार संघातून निवडून येवून, त्यांनी महत्वाचे मंत्रिपद आणि पालकमंत्रिपद सांभाळले आहे. आता त्या दुसर्यांदा मंत्री झाल्या आहेत. गेल्या 15 वर्षापासून महाड पोलादपूरचे प्रतिनिधीत्व आ. भरत गोगावले यांच्याकडे आहे. आता तेही या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील स्थलांतर रोखण्यासाठी हे दोन्ही मंत्री प्रयत्न करतील, अशी अपेक्षा रायगडवासियांकडून व्यक्त होत आहे.
रायगड जिल्हा पर्यटनासाठी नंदनवन आहे. त्यामुळे जगभरातील पर्यटक, इतिहासप्रेमी, पर्यावरण अभ्यासक व भाविक जिल्ह्यात दाखल होत असतात. गेली सतरा वर्ष मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले आहे. खराब रस्ते व वाहतूक कोंडी आणि मुलभूत सुविधांचा अभाव यामुळे असंख्य पर्यटकांनी जिल्ह्याकडे पाठ फिरवली आहे. महामार्गच्या कामाला या दोन मंत्र्यांनी समन्वय साधून चालना देण्याचीही गरज आहे. कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचे काम करण्याची मागणी सातत्याने होत आहे. त्यासाठी देखिल काम करणे गरजेचे आहे. ओस पडत असलेल्या रायगडमध्ये प्रत्येक तालुक्यात औद्योगिक वसाहत उभारणे, चांगल्या शिक्षण संस्था, चांगली आरोग्य सुविधा यावर भर देवून, लोकांना जिल्ह्यातच रोजगार कसा मिळेल, यासाठी दोन्ही मंत्र्यांनी प्रयत्न करण्याची अपेक्षा जिल्ह्यातील जनतेकडून व्यक्त केली जात आहे.