सावित्री नदी प्रदूषण प्रकरण! महाडमधील श्रीहरी कंपनीला टाळे

। महाड । प्रतिनिधी ।
महाड शहराजवळून गेलेल्या सावित्री नदीमध्ये मागील महिन्यात रासायनिक सांडपाणी जाऊन पाणी प्रदूषित झाले होते. याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विभागीय कार्यालयाने श्रीहरी केमिकल कारखान्याला बंदची नोटीस बजावली आहे. तर हायकल केमिकल या कारखान्यावर कारवाईचा प्रस्ताव पाठवला असल्याचे क्षेत्र अधिकारी कुंभार यांनी सांगितले.

मुसळधार पावसाळ्यात औद्योगिक कारखान्यातून रासायनिक सांडपाणी नाल्याद्वारे नदीला मिळते. अनेक वर्षापासून हा प्रकार सुरूच आहे. गेल्या महिन्यामध्ये सावित्री नदीमध्ये रासायनिक सांडपाणी जाऊन नदीचे पाणी लालसर झाले होते. याप्रकरणी स्थानिक नागरिकांनी महाड उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे कारवाईची मागणी केली होती. या मागणीनुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाने श्रीहरी केमिकल या कारखान्याला बंदची नोटीस बजावली आहे. 26 ते 27 जुलै दरम्यान सावित्री नदीमध्ये रासायनिक सांडपाणी मिळाल्याने पाणी दूषित झाले होते. याप्रकरणी ही कारवाई झाली आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक अधिकारी व्ही. व्ही . किल्लेदार यांनी श्रीहरी केमिकल या कारखान्याला बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे टेमघर नाल्याशेजारी असलेल्या हायकल केमिकलला देखील नोटीस बजावण्यात आली आहे. जल आणि वायु प्रदूषण प्रकरणी हायकल केमिकलला कंपनीला नोटीस बजावली जाणार असल्याचे क्षेत्र अधिकारी कुंभार यांनी सांगितले.

महाड औद्योगिक वसाहतीमधील अनेक रासायनिक कारखान्यातून मुसळधार पावसाचा गैरफायदा घेत दूषित आणि रासायनिक सांडपाणी सार्वजनिक नाल्यामध्ये सोडत असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. त्यामुळे संपूर्ण नदीचे पाणी दूषित होत आहे. असे असताना संबंधित कारखानदारांवर प्रदूषण मंडळाकडून नोटीस बजावण्या व्यतिरिक्त अन्य कोणतीही कारवाई केली जात नसल्याने प्रदूषणामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशाच प्रकारे वायू प्रदूषणामध्ये देखील वाढ होत आहे. महाड औद्योगिक वसाहतीमध्ये होत असलेल्या प्रदूषणाचा परिणाम तालुक्यातील ग्रामीण जनजीवनावर होत असल्याने शासनाने याप्रकरणी कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Exit mobile version