जलप्रदूषणाने लाखो मासे मृत्युमुखी, मच्छिमार संतप्त
| पोलादपूर | प्रतिनिधी |
महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या महाड तालुक्यातील विविध रासायनिक कारखानदारीने पावसाळ्यात रात्रीच्यावेळी जल आणि वायू प्रदूषणाचा सपाटा लावला असून, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर उग्र दर्पाच्या वायूमुळे वाहनचालकांना खोकल्याची उबळ येत असून गुदमरल्यासारखे होत आहे. तर महाड तालुक्यातील सावित्री व काळ नदीमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून लाखो मासे मृत्यूमुखी पडल्याच्या घटनांमुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून संबंधित कारखान्यांविरूध्द कधी कारवाई करण्यात येणार, असा संतप्त सवाल मच्छिमार तसेच महामार्गावर रात्री वाहने चालविणार्यांकडून विचारला जात आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चौपदरीकरणादरम्यान महाड एमआयडीसी फाट्याजवळ फ्लायओव्हर तसेच व्हेईक्युजर ब्रिज बांधण्यात आल्याने मूळ महामार्गापेक्षा आता नवीन महामार्ग उंचावरून असल्याने या महामार्गावरून जाणार्या वाहनांच्या चालकांना रात्रीच्या वेळी उग्र रासायनिक दर्पामुळे गुंगी येत आहे. अनेक चालकांना ओकारी तसेच मळमळ होत असल्याचे आणि डोळ्यांची जळजळ झाल्याने तसेच गुदमरल्यासारखे झाल्याने वाहन चालविताना अडथळा झाल्याचे दिसून येत आहे. आगामी गणेशोत्सव काळात या महामार्गावरून छोट्या वाहनांना एमआयडीसीतील वायूप्रदूषणामुळे अडथळा होऊन अपघातांचे प्रमाण वाढीस लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महाड एमआयडीसीतील रासायनिक कारखानदारी दिवसेंदिवस जलप्रदूषणदेखील वाढवत असून, पोलादपूर तालुक्यात रात्रीच्या वेळी टँकर्सद्वारे केमिकल वेस्ट म्हणजे रासायनिक घनकचरा नदीपात्रात सोडण्याचा प्रकार गेल्या काही वर्षांपासून सुरू झाला आहे. महाड औद्योगिक वसाहतीतील घातक रासायनिक सांडपाणी थेट सावित्री नदीपात्रात रात्रीच्यावेळी सोडण्यात आल्याने मागील 15 दिवसांपासून सावित्री नदी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाली आहे. परिणामी, नदीतील लाखो मासे मृत होऊन तरंगत आहेत. याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कारवाई करण्यात चालढकल करीत आहे, असा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सावित्री नदीत रासायनिक सांडपाणी सोडल्याने नदीतील पाण्याचा रंग पूर्णपणे लाल झाला असून, हजारो टन मासे मृत्युमुखी पडून तरंगू लागले आहेत. अशी वस्तुस्थिती निदर्शनास आणून नदीपात्रालगतच्या पारंपरिक मच्छिमारी करणार्या भोई समाजावर ऐन सणासुदीच्या दिवसात उपासमारीची वेळ ओढवल्याने भोई समाजा0ला प्रदूषण नियंत्रण महामंडळ व सीईटीपीने आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अन्यथा भोई समाज महाड औद्योगिक वसाहतीतील सीईटीपीच्या कार्यालयाजवळ धरणे आंदोलन करेल, असा इशारा दासगावमधील भोई समाजाचे नेते पांडुरंग निवाते यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकार्यांसहित प्रदूषण नियंत्रण महामंडळ व सीईटीपीच्या अधिकार्यांना दिला आहे.