नोकरीसाठी राज्य सरकारचा दुजाभाव
| मुंबई | प्रतिनिधी |
सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कविता राऊतने आदिवासी असल्याने आपल्यावर अन्याय केला जात असल्याचा संताप व्यक्त केला. राज्य सरकारच्या नोकरीसाठी डावलले जात असून सरकार दुजाभाव करत असल्याची भावना तिने बोलून दाखवली आहे. कविताने 2010च्या राष्ट्रकुल स्पर्धेत 10 हजार मीटर शर्यतीत भारताला कांस्यपदक जिंकून दिले होते. तसेच, 2010च्या आशियाई स्पर्धेतही तिने 10 मीटरचे रौप्य व 5 हजार मीटरमध्ये कांस्यपदक पटकावले होते.
कविता राऊतने आपल्या भावना व्यक्त करत म्हणाली की, मी आदिवासी असल्यामुळे मला शासकीय नोकरीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. माझ्या पाठिशी कुणीही गॉड फादर नाही. नोकरीसाठी अनेकदा अर्ज देऊन देखील माझ्या अर्जांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. माझ्यापेक्षा कमी गुण आणि खेळात कमी श्रेणी असलेल्या खेळाडूंना शासकीय नोकरी देण्यात आली आहे. असा गंभीर आरोप कविताने सरकारवर केला आहे. तसेच, महाराष्ट्रात राहून मला समाजासाठी काहीतरी करायचे आहे आणि यासाठी मी महाराष्ट्र सरकारकडे नोकरी मागत आहे. माझ्या बरोबरीच्या खेळाडूंना नोकरी देण्यात आली, तशी मलाही द्यावी, असेही ती म्हणाली.
कविताने केलेल्या दाव्याने तसेच पेसा भरतीवरून आदिवासी बांधव आक्रमक झाले असताना राजकारण पेटण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये पेस भरती संदर्भातील आंदोलनात काही जणांनी राजकारण केल्याचा आरोप करण्यात आला होता. पण, कविताच्या आरोपानंतर आ. हिरामण खोसकर आणि मा. आ. जेपी गावित यांनी देखील सरकारवर भेदभाव केल्याचे आरोप केले आहेत. जे.पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी विकास भवन येथे मागील 4 दिवसांपासून आदिवासी उमेदवारांचे आंदोलन सुरू आहे. यामुळे आदिवासी 17 संवर्ग पेसा पदभरतीचा मुद्दा चांगलाच चिघळला आहे.