शाळा प्रशासन विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सज्ज
। अलिबाग । प्रतिनिधी ।
उन्हाळी सुट्टीनंतर आता रायगड जिल्ह्यातील शाळा शनिवारी (दि.15) पासून सुरु होणार आहेत. विद्यार्थ्यांच्या किलबिलाटासह जिल्हा परिषदेसह खासगी शाळा गजबजणार आहेत. नवा वर्ग, नवी पुस्तके आणि गणवेशही नवा या आनंदात मुले शाळेच्या प्रतीक्षेत आहेत. शाळाही विद्यार्थ्यांच्या आगमनासाठी सज्ज झाल्या आहेत. शाळेत प्रथमच पाऊल ठेवणार्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेतील शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, सदस्यांनी तयारी जोरात केली असून, गुलाब पुष्पग, गोड पदार्थ देऊन त्यांचे जल्लोषात स्वागत केले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांनी दिली.
जिल्हाभरात जिल्हा परिषदेच्या अडीच हजार व खासगी जवळपास 500 हून अधिक शाळांमधून लाखभर विद्यार्थी ज्ञानाचे धडे गिरवत आहेत. एप्रिल महिन्याच्या दुसर्या आठवड्यानंतर परीक्षा संपल्या. त्यानंतर शाळांना सुट्टी सुरु झाली. दोन महिन्याच्या सुट्टीनंतर 15 जून रोजी शाळा सुरु होणार आहे. त्यानिमित्ताने लागणारे कंपास, वही, दप्तर अशा अनेक प्रकारचे शालेय साहित्य खरेदी करून विद्यार्थी सज्ज झाले आहेत. शाळा सुरु होण्यापूर्वी शाळेतील शिक्षकांना दोन दिवस अगोदरच शाळेत जाऊन स्वच्छता, साफसफाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये साफसफाईची लगबग दिसून आली. शिक्षण विभागाने यापूर्वी शाळापूर्व तयारी अभियान राबवून नव्याने शाळेत दाखल होणार्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी एक वेगळा उपक्रमही हाती घेतला आहे. जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी यासाठी अनेक शाळांतील शिक्षकांनी पुढाकार घेत घरोघरी जाऊन पालकांसोबत संवाद साधला. जिल्हा परिषद शाळेचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्नदेखील केला आहे. जिल्ह्यातील शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा केला जाणार आहे.
पहिल्याच दिवशी मिळणार विद्यार्थ्यांना पुस्तके रायगड जिल्हा परिषद तसेच अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना शासनाकडून पाठ्यपुस्तके देण्यात येतात. ही पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मिळतील असे नियोजन करण्यात आले आहे. सरकारच्या बालभारती विभागाकडे शिक्षण विभागाने पुस्तकांची मागणी केली होती. सरकारकडून पुस्तके प्राप्त झाली असून, ही पुस्तके तालुक्याच्या गटशिक्षण अधिकार्यांमार्फत केंद्रप्रमुख व केंद्रप्रमुखांच्या माध्यमातून मुख्याध्यापकांकडे सुपूर्द करण्यात येत आहेत. रायगड जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या 1 लाख 84 हजार 162 विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहेत.
शनिवारपासून शाळा सुरु होणार आहे. शाळा प्रवेशोत्सवाची तयारी करण्यात आली आहे. पहिल्या दिवशीच पोषण आहार देण्याचा प्रयत्न केला आहे. नवविद्यार्थ्यांचे स्वागत केले जाणार आहे. जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी आले पाहिजे यासाठीदेखील प्रयत्न केला आहे.
प्रमोद भोपी,
केंद्रप्रमुख,
आंदोशी
जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षणासह संस्कारक्षम नागरिक घडविण्याचे शिक्षण दिले जाते. माझे शिक्षणही जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले असल्याने मी माझ्या मुलालासुद्धा याच शाळेत प्रवेश घेतला आहे. येथील शिक्षकांची साधी आणि सोपी शिकवण्याची पद्धत माझ्या मुलाच्या प्रगतीत आयुष्यात मोलाची ठरेल, याचा मला विश्वास आहे.
राजेंद्र पाटील,
पालक,
चौलमळा