राज्यात 4 ऑक्टोबरपासून शाळेची घंटा वाजणार

मुख्यमंत्र्यांनी दिला हिरवा कंदील
| मुंबई | वृत्तसंस्था |
राज्यात 4 ऑक्टोबरपासून कोरोना नियमांचे पालन करुन शाळा सुरु करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिली आहे. त्यानुसार आता ग्रामीण भागात पाचवी ते बारावी, तर शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरु होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. शाळा सुरु करण्याअगोदर शिक्षक आणि पालकांना प्रशिक्षण देणार असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले आहे. कोरोना प्रतिबंधात्मक सर्व नियम पाळून शाळा सुरु केल्या जाणार आहेत. तसेच संबंधित जिल्हाधिकार्‍यांकडे सर्व निर्णय राहतील, असेही शासनाने स्पष्ट केले आहे. गेल्या दीड वर्षापासून बंद असणार्‍या शाळा सुरु होत असल्याने विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी ही आनंदाची बाब आहे. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्योत सातत्याने घसरण होत असून, रुग्ण बरे होणार्‍यांचे प्रमाण वाढत आहे. यामुळेच आता शाळा सुरु करण्याच्या संदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.

Exit mobile version