महेंद्र घरत यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
। चिरनेर । प्रतिनिधी ।
प्रकल्पग्रस्तांच्या शाळांना भूखंड मिळावे, या मागणीचे निवेदन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. सिडको प्रकल्पग्रस्तांच्या शैक्षणिक संस्था चालवीत असलेल्या शाळांना भूखंड मिळण्यासाठी दोन वर्षांपूर्वी सिडको प्रशासनाकडून प्रकल्पग्रस्तांसाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. प्रकल्पग्रस्तांच्या बर्याच संस्थांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही ही निविदा सिडकोकडून नंतर रद्द करण्यात आली होती. त्यानंतर त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. कामगार नेते तथा रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत हे सिडकोकडे पाठपुरावा करत आहेत; परंतु सिडको व्यवस्थापन पाहिजे तितके लक्ष देताना दिसत नाही. त्यामुळे महेंद्र घरत यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानभवनात भेट घेऊन निवेदन दिले व या प्रश्नाकडे लक्ष घालण्याची विनंती केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला.