| मुंबई | प्रतिनिधी |
लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. गुडी पाडव्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीची शिवालयात संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसेच, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, शेकापचे नेते जयंत पाटील, संजय राऊत आदी उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटप रखडले होते. अखेर आज ‘मविआ’चे जागावाटप जाहीर करण्यात आले आहे. त्यावेळी त्यांनी फॉर्मुलाही जाहीर केला. उद्धव ठाकरे (शिवसेना) 21, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) 10 आणि काँग्रेस 17 जागांवर लढणार आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या सांगली, भिवंडी आणि मुंबई लोकसभा मतदारसंघाचा देखील तिढा सुटला आहे. ज्यात सांगली लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडेच राहणार आहे, भिवंडी लोकसभा मतदारसंघ शरद पवार गटाकडे आणि मुंबई-उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे राहणार आहे.
शिवसेना - 21 जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे,रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी, बुलढाणा, हातकलंगणे, संभाजीनगर, शिर्डी,सांगली, हिंगोली, यवतमाळ-वाशिम, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण, मुंबई ईशान्य काँग्रेस - 17 नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली -चिमूर, चंद्रपूर, नांदेड,जालना, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक, मुंबई-उत्तर, मुंबई-उत्तर मध्य राष्ट्रवादी - 10 बारामती, शिरुर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर दक्षिण, बीड







