आम्हाला काम द्या…सुरक्षारक्षकांचा कार्यालयावर धडक मोर्चा

काम न मिळाल्यास अन्नत्याग उपोषणाचा इशारा
। नवीन पनवेल । वार्ताहर ।
2019 मध्ये भरती झालेल्या सुरक्षारक्षकांना काम उपलब्ध करून त्यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी क्रांतिकारी सुरक्षारक्षक संघर्ष समितीतर्फे 9 ऑगस्ट रोजी खांदा कॉलनी येथील रायगड जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाच्या कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

2019 मध्ये भरती झालेल्या सुरक्षा रक्षकांना कामावर रुजू करून घ्यावे व त्यांना न्याय द्यावा यासाठी बर्‍याच संघटनांनी पाठपुरावा केला आहे. तरीदेखील त्यांना न्याय मिळत नसल्याने धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. यापुढे सुरक्षा रक्षकांना काम मिळाले नाही व त्यांच्यावर अन्याय होत असेल तर येणार्‍या काळात अन्नत्याग उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. प्रतीक्षा यादीवरील सुरक्षारक्षकांना लवकरात लवकर रुजू करून घ्यावे, प्रत्यक्ष यादीतील गुणांनुसार त्यांना प्राधान्य देण्यात यावे, स्थानिक उमेदवाराबरोबर इतर जिल्ह्यातील उमेदवारांना त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात यावे, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत.

मंडळात अनेक अनागोंदी कारभार सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तसेच खरी माहिती सुरक्षारक्षकांपर्यंत पोहोचत नाही व संबंधित अधिकार्‍यांकडून उडवाउडवीची उत्तरे देऊन सुरक्षा रक्षकांना नाहक त्रास दिला जात असल्याचा आरोप या मोर्चादरम्यान करण्यात आला. या धडक मोर्चात भरती झालेले सुरक्षारक्षक सहभागी झाले होते

Exit mobile version