। अलिबाग । भारत रांजणकर ।
अलिबाग शहरातील ज्येष्ठ नागरीक तसेच विधवा, परित्यक्ता, अविवाहीत निराधार महिला यांना शासकीय मदत मिळवून देण्यात मोलाची कामगिरी करणार्या गजानन कुंडी यांना या कामात अधिक बळ मिळावे यासाठी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी व्यक्तिगत रित्या कुंडी यांना नवीन मोटारसायकल भेट दिली. त्यामुळे भारावलेल्या ज्येष्ठ नागरिकांसह निराधार महिलांनी नगरपालिकेत जाऊन नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांचा हृदय सत्कार करीत धन्यवाद दिले. या अनोख्या सत्कारामुळे नगराध्यक्ष प्रशांत नाईक देखील भारावून जात आपल्या खुर्चीवर न बसता सर्व नागरिकांसमवेत मिळसून गेले.
कुलाबा किल्ल्यातील माघी गणेशोत्सव मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असणारे गजानन कुंडी हे गेली 15 वर्षे अलिबागमध्ये ज्येष्ठ नागरिक, विधवा, अपंग, परित्यक्ता, अविवाहीत निराधार महिला आदींना शासकीय मदतीसाठी लागणार्या सरकारी विविध दाखल्यांसाठी धावपळ करुन शासकीय मदत मिळवून देण्यासाठी मोलाचे काम करीत आहेत. कोळीवाडा परिसरामध्ये हे काम गजानन कुंडी करीत असल्याने ते या कामासाठी परिचित आहेत. अनेक जण या कामासाठी त्यांच्याकडे धाव घेत असतात. आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने कुंडी यांच्याकडे हे काम करण्यासाठी त्यांच्याकडे जुनी मोटारसायकल होती. मात्र सतत तीच्यात बिघाड होत असल्याने तीची दुरुस्ती करुन करुन कुंडी हे मेताकुटीस आले होते. ही बाब अनेक नागरिकांनी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या कानावर घातली. त्यावर तातडीने प्रशांत नाईक यांनी गजानन कुंडी यांच्या सामाजिक कार्यात मोटारसायकल अभावी खंड पडू नये या दृष्टीने स्वखर्चातून नवीन मोटारसायकल खरेदी करुन दिली. नगराध्यक्षांच्या या तत्परतेने सर्व नागरिक देखील भारावून गेले. त्यामुळे आपल्या हाकेला धावून येणार्या प्रशांत नाईक यांची थेट नगरपालिकेत भेट घेत त्यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देत हृदय सत्कार करीत धन्यवाद दिले. या अनोख्या सत्काराची कल्पनाही नसल्याने प्रशांत नाईक भारावून गेले. त्यांनी आपल्या नगराध्यक्षपदाच्या खुर्चीतून उठून ज्येष्ठांच्या या सत्काराचा स्विकार केला. त्यानंतरही सर्वांच्या सोबत आपल्या दालनात उभे राहून सुख दुःखाची चर्चा करताना त्यांना येणार्या सर्व समस्या जातीने सोडविण्याचा शब्दही न चुकता नगराध्यक्ष नाईक यांनी दिला. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष गजानन नागे, गणपत भगत, भगवान वरसोलक, प्रकाश चव्हाण, शेलार, ज्ञानेश्वर बारगीर, जनिता तांडेल, अंकुश वरसोलकर, नलिनी वरसोलकर, संगिता हुले, अंजनी खमीस, गुलाब भगत, श्रुती वरसोलकर यांच्यासह सभापती अजय झुंजारराव, नगरसेवक अनिल चोपडा आदी उपस्थित होते.