वनविभागाने सतर्क राहण्याची गरज, ठोस उपाययोजनांकडे दुर्लक्ष
| धाटाव | वार्ताहर |
रोहा तालुक्यात दरवर्षी अनेक जंगलांना वणवा लागण्याच्या घटना वाढताना दिसत आहे. जानेवारीपासूनच जंगलांना वणवे लागण्याचा घटनाक्रम सुरू होतो. याच वणव्याची मालिका आठवड्यापासून सुरू झाली. यांचाच प्रत्यय सोमवारी (दि.19)आला. हनुमान टेकडी व उडदवणे परिसरात जंगलाला भीषण वणवा लागल्याचे दृश्य पाहायला मिळाले. उडदवणे येथील जंगलाला लागलेल्या वणव्याची तिव्रता भयानक होती. अख्खा जंगल जळून खाक झाले की काय? असेच अनेक मैलावरून जाणवत होते. जंगलातील वनसंपदा वर्षानुवर्षे होरपळत आहे. या वणव्यामुळे जंगलातील भलीमोठी झाडे, पशु, पक्षी नष्ट झाले आहेत. त्यामुळे वणव्यावर ठोस उपाययोजना राबविण्यात आल्या पाहिजेत, असे वनमित्रांकडून बोलले जात आहेत.
तालुक्यातील जंगलांना दरवर्षी वणवा लागत असल्याने वनसंपदा पूर्णत: धोक्यात आली. शहर आजूबाजूच्या जंगलांतील अनेक दुर्मिळ झाडे, पक्षी संकटात आले. डोंगरांना अक्षरशः टक्कल पडले. आठवड्याभरात अनेक जंगलांना वणवे लागल्याच्या घटना सुरूच आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनीच हनुमान टेकडी, तसेच, उडदवणे जंगलाला लागलेला वणवा सार्यांनाच चटका लावून गेली.
वणव्याची दाहकता समोर आणताच उपवनसंरक्षक आप्पासाहेब निकत यांनी वणवा विझविण्यासाठी टीम तातडीने कार्यरत झाली अशी माहिती दिली. सह्याद्री वन्यजीवन रक्षणार्थ संस्थेच्या कार्यकर्त्यांनीही वणवा विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. हनुमान टेकडी व उडदवणे परिसरातील वणवाही विझवला असे वनरक्षक व्ही.आय. राजपूत यांनी सांगितले. मात्र, भीषण वणव्यात जंगलांची प्रचंड हानी झाली, याची भरपाई कोण करेल, त्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज व्यक्त झाली. दरम्यान, दररोजच्या वाढत्या वणव्यावर वनविभाग आतातरी नेमका काय उपाययोजना करतो? हे समोर येणार आहे, तर वणवा समस्येवर अधिक प्रभावी लोक चळवळ उभी करावी लागेल असाच हा प्रकार आहे, हे ठळकपणे नमूद झाले आहे.
आप्पासाहेब निकत,
वाढत्या वणव्या समस्येवर प्रशासन अधिक व्यापक काम करणार आहे, तशी टीम सज्ज आहे, वणवे तातडीने विझविणे, वणवा नियंत्रण आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
उपवनसंरक्षक