मोबाईल कंपन्यांची सेवा वार्‍यावर

ग्राहकांमध्ये प्रचंड संताप

। कापोली । वार्ताहर ।

ऑनलाईनमुळे कोणतीच कामे वेळेवर होत नसल्याने गेल्या अनेक दिवसांपासून नागरिक पार वैतागले आहेत आणि त्यातच श्रीवर्धन तालूक्यातील बोर्लीपंचतन, कापोली, दिवेआगर, शिस्ते, वडवली, वेळास, भरडखोल या गावांमध्ये मोबाईल नेटवर्क देणार्‍या एअरटेल, व्होडाफोन, आयडिया या सेवेचा मागील काही महिन्यापासून फज्जा उडाला असून यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या सेवेकडे कोणतेही अधिकारी चांगल्या व अखंडित सेवेसाठी तत्पर दिसत नसल्याने दूरध्वनी व मोबाईल नेटवर्किंग सेवेबाबत परीसरात प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.

कायम गजबजणारी श्रीवर्धन तालुक्यातील मध्यवर्ती असणारी बोर्लीपंचतनही परिसरातील मोठी बाजारपेठ आहे. श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन सोबतच परिसरातील पर्यटन स्थळ असलेले दिवेआगर तसेच वेळास, कापोली, शिस्ते, कोंढेपंचतन, वांजळे, भरडखोल, वडवली, तसेच इतरही छोटी मोठी गावे आहेत. इंटरनेटच्या युगात सर्व कार्यालये, महाविद्यालये ऑनलाईन पद्धतीने जोडली गेली आहेत. परंतु, सध्या एअरटेल, व्होडाफोन, आयडीया मोबाईल कंपनीच्या सेवेला घरघर लागली असून नेटवर्क असुनही नसण्याचे प्रकार वाढले आहेत. याकडे संबधित कंपन्यांमधील अधिकारी सोयिस्कररित्या जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे भागातील नागरिकांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे एअरटेल, व्होडाफोन, आयडिया, अशा स्वरूपातील असलेली मोबाइल नेटवर्क किंवा इंटरनेट सेवा गेल्या वर्षापासून साफ कोलडमली असल्याचे दिसत असून सामान्य जनतेला याचा प्रचंड त्रास होत आहे.

मोबाईल रिचार्ज करुन वाया जातो. कारण ना धड बोलता येते ना नेट वापरु शकत. एखादी गोष्ट डाऊनलोड करायची असेल तर तासंतास वाट पहात बसावे लागते. आता तर काय बोलता बोलता फोन कट होतात. याकडे संबंधित कंपन्यांनी लक्ष द्यावे, नाहीतर नेटवर्क तरी बंद करून टाकावेत कुणीही अवलंबून राहणार नाही.

प्रमोद भायदे, कापोली, ग्राहक

एअरटेल, आयडिया, व्होडाफोन नेटवर्क सेवा पुर्ण कोलमडली आहे. परीसरात नेटवर्कचा खूप बोजवारा आहे. या नेटवर्क वाल्यांना एवढं कळत नाही की, आजकाल सर्व ठिकाणी नेटची गरज आहे. मग ते शैक्षणिक असो किंवा व्यावसायिक असो नेटमुळे डिस्ट्रिब्युटर लोकांनाही मालाची विक्री किंवा खरेदी करता येत नाही.

धवल तवसाळकर, वेळास
Exit mobile version