नेटवर्क सेवा कोलमडल्याने ग्राहकांमध्ये प्रचंड संताप
। कापोली । वार्ताहर ।
लॉकडाऊनच्या काळात गेल्या अनेक दिवसांपासून नागरिक आधीच पार वैतागले आहेत आणि त्यातच श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन, कापोली, दिवेआगर, शिस्ते, वडवली, वेळास भरडखोल या गावांमध्ये मोबाईल नेटवर्क देणार्या व्होडाफोन, आयडिया या सेवेचा मागील काही महिन्यांपासून फज्जा उडाला असून यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी बोर्लीपंचतन बाजारपेठ आहे. इंटरनेटच्या युगात सर्व कार्यालये, महाविद्यालये ऑनलाईन पद्धतीने जोडली गेली आहेत. परंतु सध्या व्होडाफोन, आयडीया मोबाईल कंपनीच्या सेवेला घरघर लागली असून नेटवर्क असून नसण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे सामान्य जनतेला याचा त्रास होत आहे. बाजारपेठेत ऑनलाइन व्यवसाय करणार्या सर्वांना सध्या या अडचणींचा सामना करावा लागत आहे, शिवाय विद्यार्थ्यांना शाळा सुरू झाल्या तर ऑनलाईन अभ्यासक्रम करावा लागणार असून कासव गती नेटवर्क असल्याने मुले अभ्यास करु शकत नाहीत. तसेच कॉलही ड्रॉप होण्याचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. कोलमडलेल्या अवस्थेत मोबाइल कंपन्या उभ्या आहेत, यासर्वांकडे जातीने लक्ष देणे गरजेचे आहे, नाहीतर बोर्लीपंचतन परिसराची अवस्था कणा मोडल्यासारखी राहील.
मोबाईल रिचार्ज करुन वाया जातो. कारण ना धड बोलता येत ना नेट वापरु शकत. एखादी गोष्ट डाऊनलोड करायची असेल तर तासन्तास वाट पहात बसावे लागते.
सुरेंद्र भायदे, ग्राहक, कापोली
आयडिया, व्होडाफोन नेटवर्क सेवा पुर्ण कोलमडली आहे. परिसरात नेटवर्कचा खूप बोजवारा आहे. नेटमुळे डिस्ट्रिब्युटर लोकांनाही मालाची विक्री किंवा खरेदी करता येत नाही.
परेश नांदविडकर, व्यापारी, बोर्लीपंचतन