सर्व्हिस रोड होतोय ‌‘पार्किंग झोन’

ग्रामस्थांना अपघातांची धास्ती

| पोलादपूर | प्रतिनिधी |

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 च्या चौपदरीकरणादरम्यान पोलादपूर तालुक्यातील पार्ले ते दिविल उड्डाणपुलाच्या दुतर्फा असलेल्या सर्व्हिस रोडवर ट्रक, कंटेनर, टँकर्सचे ‘पार्किंग झोन’ तयार झाले आहे. येथे असलेल्या राजस्थानी ढाब्याचे स्वत:चे पार्किंग झोन असूनही सर्व्हिसरोडचा सर्रास वापर वाहनचालकांकडून केला जात असल्याने पार्ले ग्रामस्थांच्या मोटारसायकली व ऑटोरिक्षांना या महाकाय वाहनांची धडक बसून अपघात होण्याची धास्ती वाटत आहे.

महामार्गावरील काही गावांना सर्व्हिसरोडद्वारे अलिप्त ठेवण्यात आले आहे. या सर्व्हिसरोडला कॅटलपास आणि अंडरपास भुयारी मार्ग करण्यात आले असून, याद्वारे पार्ले गावठाण, पार्ले बौध्दवाडी आणि पार्ले आदिवासीवाडीतील ग्रामस्थांना पश्चिमेकडील लोकवस्ती आणि पूर्वेकडील नदीपात्र तसेच, शेतजमिनी आणि गुरांचे वाडे आणि शेतघरांकडे ये-जा करणे शक्य होत असते. या सर्व्हिसरोडच्या मधोमध असलेल्या ओव्हरब्रिजवरून राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक सुरू असून, दिविल केटी बंधाऱ्याच्या आधी काही अंतरावर हा ओव्हरब्रिज संपताच राजस्थानी हॉटेलमध्ये येणाऱ्या प्युअर व्हेज वाहतूकदार ड्रायव्हर व क्लिनरच्या ग्राहकांच्या ट्रक, कंटेनर, टँकर्स आदी वाहनांचे पार्किंग पूर्वेकडील नदीपात्रालगत मातीचा भराव करून तयार केलेल्या क्षेत्रात करण्याची सुविधा या हॉटेलवजा ढाब्याच्या मालकाने उपलब्ध केली आहे. मात्र, महामार्गावरील वाहतूकदारांमध्ये राजस्थान तसेच गुजरात राज्यातील शाकाहारी वाहतूकदारांची संख्या अधिक असल्याने याठिकाणी वाहनांची गर्दी संपूर्ण पार्किंग झोन व्यापून सर्व्हिसरोडपर्यंत होत असल्याचे दिसून येत आहे. दिवसा जेवणानंतर वाहने विश्रांतीसाठी उभी केलेली दिसतात, त्याचप्रकारे रात्रीदेखील वाहनांची गर्दी होत असल्याने अनेक दुचाकी वाहनांना ही वाहने मागे-पुढे करताना अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राष्ट्रीय महामार्ग वाहतुक पोलीस आणि पोलादपूर पोलीसांनी तातडीने या भागातील वाहनांची अनावश्यक दाटी कमी करण्यासाठी कायदेशीर प्रयत्न करण्याची मागणी पार्ले येथील ग्रामस्थांकडून होत आहे.

Exit mobile version