महिला गृहउद्योजिकांचे अर्थकारण कोलमडले
| पाली /बेणसे | प्रतिनिधी |
दिवाळी म्हणजे दिव्यांची रोषणाई, खमंग फराळाची मोठी रेलचेल असते. आताच्या धावपळीच्या जगात गृहिणींना दिवाळी फराळ बनवायला वेळ मिळत नाही. त्यामुळे तयार फराळाला गृहिणींची पसंती मिळते. परंतु, यावर्षी महागाईची झळ तयार फराळालाही बसली आहे. यंदा फराळाच्या किमतीत 10 ते 15 टक्के वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलेंडर, डाळी, तूप, जिरे, पोहे, मैदा, तेल, शेंगदाणे, खोबरा यांच्या दरात वाढ झाल्यामुळे त्याचा परिणाम दिवाळीच्या फराळाच्या दरावर झालेला आहे.
यंदा रेडीमेड फराळ खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर फराळ बनवून विकणाऱ्यांची दिवाळी फराळ बनवून विकण्याची लगबग सुरू झालेली आहे. यंदा दिवाळीच्या फराळात 10 ते 15 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. लाडू, चिवडा, शंकरपाळी, चिरोटे, करंजी यांचे दर अधिक वाढलेले आहेत.
महागाईचे सावट सध्या घरगुती महिला उद्योजिका आणि लघु व्यावसायिकांसमोर उभे ठाकले आहे. अवघ्या काही दिवसांवर आलेल्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांच्या स्वागतासाठी फराळ तयार करण्याची लगबग सुरू असतानाच, महागाईच्या भडक्याने या व्यवसायाचे अर्थकारण पूर्णपणे कोलमडले आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये तब्बल 40 जीवनावश्यक वस्तूंच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. या वाढत्या किमतींमुळे घरगुती फराळ तयार करून आपला संसार चालवणाऱ्या महिला उद्योजिकांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे.
चकली, लाडू, शेव, चिवडा यांसारख्या पारंपरिक दिवाळी फराळाच्या एकूण उत्पादनात अंदाजे 60 टक्के खर्च केवळ तेल आणि डाळींचाच असतो. मोठ्या प्रमाणावर माल खरेदी करणारे घाऊक व्यापारी किंवा उद्योजक कमी दरात कच्चा माल खरेदी करू शकतात. मात्र, घरगुती महिला उद्योजिकांची खरेदीची मर्यादा कमी असल्याने त्यांना होलसेल बाजारात म्हणावा तसा फायदा किंवा मार्जिन मिळत नाही. थोडेफार मार्जिन मिळवण्यासाठी घाऊक बाजारात जावे, तर आधीच वाढलेले भाव आणि उद्या त्यात आणखी वाढ होण्याचा धोका अशा कात्रीत व्यावसायिक सापडले आहेत. दिवाळीचा आनंद द्विगुणित करणाऱ्या महिला उद्योजिकांचे हे अर्थकारण सुरळीत राहण्यासाठी आणि महागाईच्या या फेऱ्यातून त्यांना दिलासा मिळण्यासाठी स्थानिक पातळीवर काही प्रशासकीय किंवा आर्थिक उपाययोजना होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
घरगुती फराळ उत्पादक आरोग्याची काळजी घेऊन आपल्या ग्राहकांसाठी दर्जेदार मालाचा वापर करतात. मात्र, महागाई वाढल्याने उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होत आहे. त्यामुळे ग्राहक व उत्पन्न टिकवण्याचे मोठे आव्हान आहे.
प्राची साठे-गोळे
गृहउद्योजिका
