शारलोट तलाव स्वच्छता अभियान तूर्तास स्थगित

। माथेरान । वार्ताहर ।
माथेरान मधील शारलोट तलाव स्वच्छता अभियान डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा मार्फत केले जाणार होते. परंतु काही नैसर्गिक आपत्ती आणि इतर काही तांत्रिक बाबींच्या अनुषंगाने सदरील अभियान हे तूर्तास स्थगित करण्यात आले आहे.

माथेरान येथील शारलोट तलावाचे गाळ काढण्याचे काम आणि स्वच्छता मोहीम अभियान हे येत्या २६ व २७ जुलै रोजी डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे करण्यात येणार होते.महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, माथेरान गिरीस्थान नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हे नियोजन करण्यात आले होते.परंतु या शारलोट तलावातील पाण्याचा विसर्ग हा मोरबे धरण येथे सोडण्यात येणार होता.या विसर्गामुळे मोरबे धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार होती.

हे मोरबे धरण मुंबई महानगरपालिका यांच्या अधिनस्त असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि मुंबई महानगरपालिका मोरबे धरण व्यवस्थापन यांचा देखील अभिप्राय विचारात घेणे आवश्यक आहे.तसेच वेळोवेळी रेड अलर्ट आणि यंदाच्या मोसमात माथेरान मध्ये ३०१२.८ मिलिमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे.या पार्श्वभूमीवर आणि काही इतर तांत्रिक बाबींमुळे सदरील अभियान तूर्तास स्थगित करण्यात आले आहे.असे पत्र माथेरान नगरपालिकेमार्फत प्रसिद्ध करण्यात आले आहे. परंतु हे अभियान स्थगित झाल्यामुळे माथेरान नागरिकांन मधुन नाराजीचे सूर येऊ लागले आहेत.एक तर माथेरान एमजीपी हा शारलोट तलाव स्वच्छतेसाठी नेहमीच आडकाठी करीत असते.बैठकीच्या माध्यमातून तरी या तलावाची स्वच्छता करून माथेरान वासीयांना आणि पर्यटकांना स्वच्छ पाणी मिळाले असते.परंतु हे स्वच्छता अभियान देखील काही तांत्रिक बाबींमुळे स्थगित केले गेले आहे.

Exit mobile version