शारलोट तलाव यंदाही गाळातच
| माथेरान | प्रतिनिधी |
जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानला पाणी पुरवठा करणाऱ्या ब्रिटिशकालीन शारलोट तलावाची गेल्या आठ वर्षांपासून साफसफाई झाली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून पाणीसाठा कमी झाला आहे. अशातच सध्याची राजकिय परिस्थिती पाहता तसेच अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे हा तलाव गाळमुक्त होण्याची आशाही धूसर झाली आहे. माथेरान शहराच्या पश्चिमेला तीनही बाजूंनी गर्द हिरवी वनराई, एका बाजूला दरीचं टोक, त्या टोकाच्या काही अंतरावर पूल आणि दूरवर पाणीच पाणी असणारा शारलोट तलाव आहे. ब्रिटिशांनी भविष्याचा विचार करून नियोजनबद्ध पद्धतीने तलाव बांधला. तेव्हापासून शारलोटचे पाणी माथेरानकर पिण्यासाठी वापरत आहेत. तीन बाजूंनी असलेल्या उतारावर तलाव असल्याने पावसाच्या पाण्याबरोबरच माती, झाडीझुडपे, लाकूड, पर्यटकांनी टाकलेल्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, खाऊची रॅपरही त्यात वाहत येतात आणि साचून राहतात.
हा तलाव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अखत्यारीत येतो. 2015 मध्ये नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत श्री सदस्यांकडून या तलावाची स्वच्छता करण्यात आली होती. ब्रिटिशकाळीन या तलावाची उंची पुलापासून 60 फूट आहे. गेली आठ वर्षे या तलावाची सफाई केली नसल्याने पावसात वाहून आलेला गाळ या तलावात साचला असून अंदाजे दहा ते पंधरा फूट गाळ असल्याची शक्यता आहे. पावसाचे तीन महिने उलटल्यानंतर आता गाळ काढण्याचे काम करणे म्हणजे वरातीमागून घोडे नाचविण्यासारखे आहे. पावसाचं पाणी झऱ्यांद्वारे या तलावात साठविले जाते. माथेरानमध्ये आतापर्यंत साडे चार हजार मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला आहे.
आठ वर्षांपासून दुर्लक्ष
माथेरान पालिका पूर्वीच्या काळात स्थानिक मजूर घेऊन शारलोट तलावाची स्वच्छता करीत असत. जून महिन्याच्या शेवटी तलावातील उर्वरित पाणी सोडून देत व तलाव स्वच्छ केला जात असे. पण मागील आठ वर्षांपासून पालिकेने तलावाची स्वच्छता केली नाही. तलावात गाळाचे प्रमाण वाढत जात आहे. यामुळे भविष्यात माथेरानकरांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागणार हे निश्चित.
यावर्षी तरी शारलोट तलाव स्वच्छ होईल असे वाटले होते; पण पालिका व एमजेपीने सर्व नळधारकांच्या तोंडाला पाने पुसली. आठ वर्षे गाळ काढला नसल्याने तलावात गाळ खूप साचला आहे. त्यामुळे भविष्यात माथेरानला पाणी टंचाईचे संकट भासू शकते.
सुनील शिंदे, सामाजिक कायकर्ते