पालीतील ‘ती’ मोरी बिनकामाची

अयोग्य व निकृष्ट दर्जाचे काम; स्थानिकांचे नगरपंचायतीला तक्रारी अर्ज

| सुधागड-पाली | वार्ताहर |

बर्‍याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पाली नगरपंचायतीने जुन्या मोर्‍या काढून नवीन मोरी टाकण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र, येथे स्लॅब टाकणे आवश्यक असताना सिमेंटचे पाईप टाकण्यात आले आहेत. ते ही सरळ रेषेमध्ये नाहीत, याशिवाय रचनादेखील अयोग्य आहे. त्यामुळे पावसाळ्यात नाल्यातील पाणी जाण्यास अडथळा येईल. तसेच नगरपंचायत अधिकारी व अभियंतादेखील काम पाहण्यासाठी येत नाहीत. अशा स्वरूपाची लेखी तक्रार स्थानिक नागरिकांनी पाली नगरपंचायतीकडे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, पाली नगरपंचायत हद्दीत कुंभार आळी येथे सुरू असलेल्या मोरीच्या कामावरती नगरपंचायत इंजिनिअर तसेच नगरपंचायतीचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. सदर कामावर नगरपंचायत कार्यरत इंजिनियर यांनी कुठल्याही प्रकारची पाहणी केलेली नाही. तसेच या ठिकाणी स्लॅब ड्रेनची काम मंजूर आहे. सदरील ठेकेदार सिमेंट पाईप टाकून मोरीचे काम करीत आहे. संबंधित ठेकेदार पूर्णपणे निष्कृष्ट दर्जाचे काम करत आहे व सदर काम होत असताना संबंधित इंजिनियरचे लक्ष नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. संबंधित काम योग्यप्रमाणे तसेच मंजूर इस्टिमेटप्रमाणे होत नाही. त्यामुळे भविष्यात पावसाळ्यात मोहल्ला परिसरात हे सांडपाणी फिरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

काम करत असताना सदरील नाल्याचा पाण्याचा फ्लो ज्या मार्गाने आहेत त्यात अडथळा निर्माण होईल व पाणी आवारात पसरेल, त्यामुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागेल. या सर्व बाबींचा पाली नगरपंचायतीने वैयक्तिक लक्ष देऊन मंजूर असलेले कामे योग्य रीतीने पूर्ण करून घ्यावीत, अशी मागणी येथील रहिवासी करत आहेत. याबाबतदेखील येथील रहिवाशांनी पाली नगरपंचायतीमध्ये या कामाबाबत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीकडे पाली नगरपंचायत याबाबत काय पाऊल उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version