महिलांसह असंख्य कार्यकर्त्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
मोहन धुमाळ, अंजली पाटील यांचा प्रचार जल्लोषात
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील कावीर जिल्हा परिषद मतदार संघातील उमेदवार मोहन धुमाळ आणि रामराज पंचायत समिती मतदार संघातील उमेदवार अंजली पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ शनिवारी (दि.24) रामराज येथे झाला. श्री हनुमानाचे दर्शन घेऊन नारळ वाढवून प्रचाराला सुरुवात करण्यात आली. यावेळी रामराजमध्ये शेकापच्या प्रचाराचा धमाका दिसून आला. शेकापच्या उमेदवारांना महिलांसह असंख्य कार्यकर्त्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. मोहन धुमाळ आणि अंजली पाटील यांचे मतदारांकडून देखील जल्लोषात स्वागत करण्यात आले.
यावेळी शेकाप तालुका पुरोगामी युवक अध्यक्ष विक्रांत वार्डे, नवशाद मुजावर अशोक खोत, अलिबाग पंचायत समितीच्या माजी सभापती प्रिया वेटकोळी, मधुकर ढेबे, संजय पाटील, माजी सरपंच सुरेखा झावरे, देवयानी पाटील, महेश झावरे, जयवंत तांबडकर, सुडकोलीच्या माजी सरपंच प्रिती तांबडकर, सुधीर पाटील, हरिश्चंद्र भोनकर, बाळू पाटील, यशवंत भगत, रामचंद्र गुंड, अनिता पाटील, नंदकुमार गावडे, मनिषा धुमाळ आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कावीर जिल्हा परिषद मतदार संघामध्ये सहाणपासून कावीर, बामणगांव, खानाव, बेलोशी, चिंचोटी, रामराज, बोरघर, सुडकोली आदी ग्रामपंचायतीमधील अनेक गावांचा समावेश आहे. या मतदार संघात 29 हजारहून अधिक मतदार आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणूकीचे मतदान 5 फेब्रुवारीला आहे. त्या पार्श्वभूमीवर शेकाप महाविकास आघाडीचे उमेदवार मोहन धुमाळ कावीर जिल्हा परिषद मतदार संघातून उभे राहिले आहेत. तसेच रामराज पंचायत समिती मतदार संघातून अंजली पाटील, कावीर पंचायत समिती मतदारसंघातून अनिल पाटील निवडणूकीच्या रिंगणात आहेत. शेकाप महाविकास आघाडीच्या वतीने प्रचाराला सुरुवात झाली आहे. गाव भेटीसह कार्यकर्ते व मतदारांना भेटून मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे.
अलिबाग तालुक्यातील कावीर जिल्हा परिषदेचे शेकाप महाविकास आघाडीचे उमेदवार मोहन धुमाळ व रामराज पंचायत समितीच्या उमेदवार अंजली पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ शनिवारी सकाळी मोठ्या जल्लोषात झाला. हातात लाल बावटा घेऊन महिला व अन्य कार्यकर्ते प्रचार रॅलीत सहभागी झाले होते. शेतकरी कामगार पक्षाचा विजय असो अशा घोषणा देत असताना मोहन धुमाळ तसेच अंजली पाटील यांना निवडून देण्याचे आवाहनही करण्यात आले.
सर्वप्रथम रामराजमधील हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेण्यात आले. त्यानंतर प्रचाराला सुरुवात करण्यात आली.रामराज बाजारपेठांसह गावांतील घरोघरी जाऊन मतदान करण्याची भावनिक साद देण्यात आली. मोहन धुमाळ व अंजली पाटील यांच्या प्रचारार्थ शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. स्वंयस्फुर्तीने कार्यकर्ते प्रचारात सामील झाले होते. मोहन धुमाळ यांचे गावात आगमन होताच, अनेकांकडून औक्षण करण्यात आले. एक वेगळा उत्साह या निमित्ताने पहावयास मिळाला.
