। मुरूड जंजिरा । प्रतिनिधी ।
समुद्रात मिळनारी शेवंड मासळी आखाती प्रदेशात आणि मुंबई- पुण्यातील मोठ्या किंवा त्रितरांकित, पंचतारांकित हॉटेल्स मधून लोकप्रिय आहेत. अत्यंत स्वादिष्ट असणार्या या मासळीला पर्यटक आणि मत्स्यप्रेमीतून मोठी मागणी आहे. परंतु शेवंड मासळी तात्काळ मिळणे शक्य नसते. मुरूड तालुक्यातील राजपुरी येथे राहणारे मासळी खरेदी- विक्री व्यावसायिक धनंजय गिदी यांनी सांगितले की, सध्या या भागात शेवंड विक्रीस येत नाहीत. शेवंड मासळीचा हंगाम डिसेंबर महिन्यात सुरू होणार आहे.
धनंजय गिदी यांचे राजपुरी येथे साई- नारायण फिशरीज ही मासळी खरेदी- विक्री करणारी कंपनी असून येथून शेवंड मासळी खरेदी विक्री केली जाते. येथून मासळी तळोजा येथे मोठ्या कंपनीकडे विक्रीसाठी नेण्यात येते. राजपुरी, खामदे, भरोडखोल, वाशी हवेली येथील मच्छिमार शेवंड मासळी येथे विक्रीस आणतात. शेवंडला 1700 ते 1800 किलोला भाव मिळतो. या भागात एका नौकेला 10 किलो शेवंड मिळू शकते अशी माहिती धनंजय गिदी यांनी दिली. डिस्को जाळी वापरून शेवंड मासेमारी केली जाते.
शेवंड ही संधीपाद वर्गात मोडणारी मासळी आहे. स्थानिक मच्छिमार आणि मोठ्या मच्छिमारांना आर्थिक उत्पन्न मिळवून देणारी ही मासळी वेगवेगळ्या समुद्रात सापडते. शेवंडांचे अंतर्गत शरीर हिरव्या कायटीनमय कवचांनी वेढलेले असून पाणवनस्पती भक्षण करणारी ही मासळी निशाचर आहे. शेवंडचे आयुष्यमान सुमारे 50 वर्षे असते. नर मादीपेक्षा आकाराने मोठे असतात. धनंजय गिदी यांनी सांगितले की, शेवंड मासळी खडकाळ समुद्रात सापडते.