कचरा संकलनात पिशव्यांचा खच; महापालिकेच्या कारवाईत दिरंगाई
। पनवेल । प्रतिनिधी।
सरकारने एकीकडे प्लास्टिक वापरावर बंदी घातलेली असताना पनवेल महापालिका क्षेत्रात पुन्हा प्लास्टिकचा मुक्त वापर सुरू झालेला दिसून येत आहे. त्यामुळे कचर्यातून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक दिसू लागले आहे, तर ग्राहकांकडून प्लास्टिकच्या पिशवीची मागणी करण्यात येत असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे महापालिकेकडून वारंवार करण्यात येणारी जनजागृती आणि कारवाई याचा काहीच उपयोग होत नसल्याचे दिसून येत आहे.
शहरात खाद्यपदार्थ विक्रेते, हॉटेल, उपाहारगृहे, हातगाडीवाले, छोटे-मोठे व्यावसायिक अशा सर्वच घटकांकडून बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर सुरू आहे. पनवेल महापालिकेकडून प्लास्टिक बंदीची मोहीम थंडावल्याने पुन्हा प्लास्टिकचा वापर सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात कचरा संकलन करणार्या घंटागाड्यांमध्ये कचर्यापेक्षा प्लास्टिकच्या पिशव्यांचा पडलेला खच सर्वाधिक दिसून येत आहे. घरगुती कचर्यातून निघणार्या प्लास्टिकच्या कचर्यामुळे पनवेल पालिका क्षेत्रातील प्लास्टिक बंदी प्रभावीपणे राबवली जात नसल्याचे चित्र दिसून येत आहे. पालिकेकडून प्लास्टिकवर तुरळक कारवाई सुरू आहे. मागील काही दिवसांपूर्वी मार्केटमधील काही व्यावसायिकांना दंड ठोठावले होते. त्यानंतर पथकाकडून मोहिमेकडे दुर्लक्ष होत असल्याने भाजीबाजारामध्ये कमी मायक्रॉनच्या पिशव्यांचा सर्रास वापर केला जात आहे. या पिशव्यातून मटण, चिकन, अंडी, दही, खाद्यतेल, फळांची विक्री केली जात आहे.
असा आहे दंड
शहरातील नागरिक, दुकानदार, व्यापारीवर्गाकडे 75 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे, तसेच सिंगल यूज प्लास्टिक आढळल्यास त्यांच्यावर प्रथम वेळेस पाच हजार, दुसर्या वेळेस आढळल्यास 10 हजार रुपये दंड ठोठावला जातो, मात्र तिसर्या वेळी आढळल्यास 25 हजारांचा दंड आणि तीन महिन्यांचा कारावास, अशाप्रकारे कायदेशीर कारवाई करण्यात येते. यात प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक कव्हर असलेले मिठाईचे बॉक्स, थर्माकोल व डिस्पोजेबल प्लास्टिकचे ताट, कप, प्लेट, ग्लास आदींचा समावेश आहे.