चिंचबादेवीच्या निरोप पालखीने उत्सवाची भक्तिमय सांगता
| बोर्लीपंचतन | मकरंद जाधव |
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन गावची ग्रामदेवता चिंचबादेवीचा होळी पौर्णिमेपासून सुरू होणारा पारंपरिक आणि प्रसिद्ध असा शिमगोत्सव यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरा करण्यात आला. आठ दिवस गावात भक्ती, परंपरा आणि उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळाले. या उत्सवाची सांगता चिंचबादेवीच्या निरोप पालखी मिरवणुकीने भावपुर्ण वातावरणात करण्यात आली.
परंपरेनुसार धुलीवंदनाच्या दिवशी चिंचबादेवी पालखीतून आपल्या मुख्य मंदिरातून म्हणजेच ‘सासर’हून होळीवरील मंदिरात म्हणजेच ‘माहेरी’ येते. देवीच्या या आगमन सोहळ्याला गावात विशेष धार्मिक महत्त्व असून, या दिवशी संपूर्ण बोर्लीपंचतन गाव भक्तिभावाने न्हाऊन निघते. गावातील पालखी मार्गावरील संपूर्ण रस्ता महिला दुधाने शिंपतात. प्रत्येक घरात देवीची विधिवत पूजा केली जाते आणि देवीच्या जयघोषाने वातावरण दुमदुमून जाते. देवी माहेरी आल्यानंतर पुढील पाच ते सहा दिवस गावात उत्सवाचे आणि भक्तिमय वातावरण असते. या काळात गावातील मुंबईकर चाकरमानी तसेच पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनासाठी बोर्लीपंचतन येथे येतात. भाविक देवीची खणा-नारळाने ओटी भरून नवसफेड करतात तसेच आपली गाऱ्हाणी देवीसमोर मांडतात. त्यामुळे मंदिर परिसरात या दिवसांत भाविकांची मोठी गर्दी उसळलेली पाहायला मिळते.
या कालावधीत होळीवरील सभामंडपात रात्री विविध समाजांच्या वतीने नाटक, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच पारंपरिक कला सादर केल्या जातात. त्यामुळे गावात आनंद, उत्साह आणि एकोप्याचे वातावरण निर्माण होते. अखंड आगरी समाजाच्या वतीने सादर करण्यात येणारे पारंपरिक व प्रसिद्ध ‘म्हशाचे सोंग’ हे शिमगोत्सवाचे खास आकर्षण ठरते.
हि सोंगं पाहण्यासाठी गावातील तसेच पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. शिमगोत्सवातील ही आगळीवेगळी परंपरा बोर्लीपंचतनच्या लोकसंस्कृतीचे आणि आगरी समाजाच्या सांस्कृतिक वारशाचे जिवंत प्रतीक मानली जाते. उत्सवाच्या सांगता दिवशी सायंकाळी चिंचबादेवीची निरोप पालखी गावातून वाजत-गाजत काढण्यात आली. गुलालाच्या उधळणीत आणि देवीच्या जयघोषात निघालेल्या या पालखी मिरवणुकीने संपूर्ण गाव दुमदुमून गेले. गावातील प्रमुख ठिकाणी पालखीचे पूजन करून देवीला भावपूर्ण निरोप देण्यात आला. या मिरवणुकीत ग्रामस्थ, भाविक तसेच चाकरमानी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भक्तिभाव,परंपरा आणि उत्साह यांचे सुंदर दर्शन घडवणाऱ्या या सोहळ्याने बोर्लीपंचतनच्या प्रसिद्ध शिमगोत्सवाची उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात सांगता झाली.
