| पुणे | प्रतिनिधी |
ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर पुण्यातील आणि देशभर प्रसिद्ध असलेल्या चितळे बंधू मिठाईच्या दुकानात चोरी झाली आहे. पहाटेच्या दरम्यान ही घटना घडली असून, 1 लाख 41 हजारांची रोख रक्कम चोरांनी लंपास केली. त्यासोबतच चितळेंची प्रसिद्ध असलेली बाकरवडीही त्यांंनी चोरांनी नेली. या चोरीच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. बाणेर पोलिसांना चोरी झाल्याची माहिती समजताच घटनास्थळी पाहणी करून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.
चितळे बंधू मिठाईवाल्यांच्या बाणेर शाखेत रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास दोन चोरट्यांनी गल्ल्यातील रोख रक्कम लंपास केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही रक्कम 1 लाख 41 हजार रुपये इतकी आहे. लॉकरमधील मध्यभागी असलेला शटर लॉक केलेला नसल्यामुळे चोरट्यांना तो उघडणे सोपे गेले. मात्र, एवढी आतली माहिती चोरट्यांना कशी मिळाली, याचाही पोलीस शोध घेत आहेत. या कटात कोणता कामगार किंवा आतला माणूस सहभागी आहे का, याची शंका वर्तवली जात आहे. बाणेर पोलीस ठाण्यामध्ये या चोरीसंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरांचा शोध घेतला जात आहे. चोरांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेतला आणि चोरी केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहात तपासाला सुरूवात केली आहे.






