| मुंबई | प्रतिनिधी |
वांद्रे टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली. या झालेल्या चेंगराचेंगरीत नऊ प्रवासी जखमी झाले आहेत. वांद्रे रेल्वे स्थानकावरुन गोरखपूरकडे जाणार्या एक्स्प्रेसमध्ये चढताना प्लॅटफॉर्मवर ही चेंगराचेंगरी झाली. यामध्ये दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. यामधील जखमी रुग्णांना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दिवाळीच्या सुट्टीमुळे उत्तर प्रदेश, बिहारकडे जाणार्या मेल-एक्स्प्रसे गाड्यांना मोठी गर्दी आहे. रविवारी पहाटे 5 वाजून 10 मिनिटांनी बांद्रा टर्मिनसहून गोरखपूर एक्स्प्रेस सुटणार होती. या एक्स्प्रेसने प्रवास करण्यासाठी प्रवासी रात्रीपासूनच स्थानकात आले होते. एक्स्प्रेस प्लॅटफॉर्मला लागताच ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्रवाशांनी एकच गर्दी केली. याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या अधिकार्यांनी दिली आहे. गोरखपूर ट्रेनची वेळ बदलण्यात आल्याने प्रवाशांची धावपळ झाल्याने चेंगराचेंगरीची घटना घडल्याचे समजते. प्रवाशांची संख्या जास्त असल्याने एकच गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीमध्ये शब्बीर अब्दुल रहमान (40), परमेश्वर सुखदार गुप्ता (28), रवींद्र हरिहर चुमा (30), रामसेवक रवींद्र प्रसाद प्रजापती (29), संजय तिलकराम कांगे (27), दिव्यांशु योगेंद्र (18), मोहम्मद शरीफ शेख (25), इंद्रजीत साहनी (19) आणि नूर मोहम्मद शेख (18) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.