ॲड. दत्ता पाटील लॉ कॉलेजमध्ये गौरव
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील वाघ्रण गावचे सुपुत्र आणि जे.एस.एम. कॉलेज तसेच ॲड. दत्ता पाटील लॉ कॉलेजचे माजी विद्यार्थी ॲड. सन्मान पाटील यांची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर परीक्षेत निवड झाली आहे. या देदीप्यमान यशाबद्दल ॲड. दत्ता पाटील लॉ कॉलेजतर्फे सन्मान पाटील आणि त्यांच्या आई-वडीलांचा जेएसएमचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.
सन्मान पाटील यांनी अलिबाग येथे आपले शालेय व उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर जे.एस.एम. कॉलेजमधून पदवी संपादन केली. त्यानंतर 2017 मध्ये ॲड. दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉ मधून त्यांनी एलएलबी पूर्ण केले. वडील ॲड. प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग जिल्हा न्यायालयात वकिली करत असतानाच त्यांनी लॉकडाऊनच्या काळात या परीक्षेत यश मिळवण्यासाठी जिद्दीने तयारी सुरू केली होती. सन्मान पाटील यांनी सांगितले की, न्यायाधीश पद हे समाजातील एक मानाचे पद आहे, ही भावना कायम मनात होती. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी सातत्य आणि संयम अत्यंत आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षेच्या प्रवासात अपयश आले तरी मी हे करू शकतो हा आत्मविश्वास ठेवून अभ्यास सुरू ठेवला. आपल्या महाविद्यालयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना ते म्हणाले की, प्राध्यापकांच्या उत्तम मार्गदर्शनामुळे कायद्याच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट झाल्या, ज्याचा फायदा परीक्षेत झाला. तसेच, महाविद्यालयात होणाऱ्या मूट कोर्ट स्पर्धांमध्ये सहभाग घेतल्याने वकिलीचा पाया भक्कम झाला. अलिबागमध्ये हे महाविद्यालय असल्यामुळे ग्रामीण भागातील तळागाळातील विद्यार्थ्यांना कायद्याचे शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. विद्यार्थ्यांनी या परीक्षेकडे सकारात्मकतेने बघून तयारी करणे गरजेचे असून, या प्रवासात विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मार्गदर्शन करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली.
या सोहळ्याप्रसंगी जनता शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्ष डॉ. साक्षी पाटील, प्राचार्य डॉ. सोनाली पाटील, उपप्राचार्य डॉ. प्रविण गायकवाड, लॉ कॉलेजच्या नॅक समन्वयक प्रा. निलम म्हात्रे आणि प्रा. डॉ. संदिप घाडगे यांनीही सन्मान पाटील यांचे अभिनंदन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. चिन्मय राणे, प्रा. पियुषा पाटील, प्रा. कौशिक बोडस आणि प्रा. सूरज पुरी यांनी विशेष परिश्रम घेतले. या सोहळ्याला महाविद्यालयातील प्राध्यापक, 200 विद्यार्थी, पालक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







