श्रीवर्धन नगर परिषदेने केले जलवाहिन्या बदलण्याचे काम

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

दोन वर्षांपूर्वी श्रीवर्धन नगर परिषदेकडून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या रानवली पाझर तलावापासून श्रीवर्धन शहरापर्यंत नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम करण्यात आले. त्याचप्रमाणे रानवली पाझर तलाव या ठिकाणी नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला. कोल्हापूर येथील रविराज इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने सदर जलशुद्धीकरण प्रकल्प निर्माणाचे व जलवाहिन्या बदलण्याचे काम केले आहे. मात्र या जलवाहिन्या बदलण्याच्या कामामध्ये जलवाहिन्या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या वापरल्यामुळे जेव्हापासून हे काम पूर्ण झाले आहे तेव्हापासून नियमितपणे जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार घडत आहेत.

या कामाचा लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे व मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत मोठा गाजावाजा करून करण्यात आला होता. परंतु, जलवाहिन्या बदलण्याचे काम सुरू असताना त्यावरती श्रीवर्धन नगरपरिषदेकडून तज्ञ व्यक्तीची नेमणूक होणे गरजेचे असताना, केवळ ठेकेदाराच्या सोयीप्रमाणे काम करून घेण्यात आल्याने काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. रानवली पाझर तलाव ते श्रीवर्धन या मार्गावरती रोज कुठे ना कुठेतरी जलवाहिनी फुटण्याचे प्रकार घडतात व पाझर तलावातील लाखो लिटर पाणी वाया जात आहे.

श्रीवर्धनच्या नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे या हेतूने जलशुद्धीकरण प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. परंतु, जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर सुद्धा श्रीवर्धन शहरातील नागरिकांना अनेक वेळा गढूळ पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे जलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये नक्कीच शुद्धीकरण होते की दूषितिकरण होते. असा प्रश्न नागरिकांना पडलेला पाहायला मिळतो. गेल्या अनेक दिवसांपासून श्रीवर्धन नगर परिषदेमध्ये कायमस्वरूपी मुख्याधिकारी नेमणूक करण्यात आलेली नाही. सतत कोणत्या ना कोणत्यातरी अन्य नगर परिषदेच्या किंवा नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांकडे श्रीवर्धन नगरपरिषदेचा कार्यभार सोपवण्यात येतो. पर्यायाने फिरत्या रंगमंचा प्रमाणे श्रीवर्धन नगरपरिषदेच्या कामगारावर याचा गंभीर परिणाम झालेला दिसून येतो. पाणी वेळेवर येत नसल्यामुळे श्रीवर्धन मधील नागरिकांना नेहमीच मनस्ताप सहन करावा लागतो. तरी या सर्व प्रकाराबाबत श्रीवर्धन नगर परिषदेने एखाद्या तज्ञ अभियंत्यांची नेमणूक करून झालेल्या कामाचे पुन्हा एकदा ऑडिट करावे. अशी मागणी जनतेमधून केली जात आहे.

श्रीवर्धन नगरपरिषदेला पाणीपुरवठा करणाऱ्या पाझर तलावापासून श्रीवर्धन पर्यंत जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार घडत आहेत हे मान्य आहे. परंतु जर का पाण्याला प्रेशर कमी केले तर जलवाहिन्या फुटणार नाहीत. परंतु शहरातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा त्यामुळे होत नाही. त्यासाठी एक ठराविक प्रेशरने पाणी सोडावेच लागते. यासाठी आमचे अभियंते प्रयत्न करत आहेत व लवकरच आम्ही यातून मार्ग काढू.

-विठ्ठल राठोड,
मुख्याधिकारी, श्रीवर्धन नगरपरिषद.

Exit mobile version