| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत मधील वारे येथून सुरुंग आणि पुढे ताडवाडी कडे जाणारा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने बनविला आहे. हा तीन किलोमीटर लांबीचा रस्ता रुंदीकरण आणि नंतर डांबरीकरण करून तयार केला आहे. मात्र या रस्त्यावरील मे 2023 मध्ये रुंदीकरण केलेली साईड ही दबून गेलेली आहे. तर काही ठिकाणी खचली आहे. तब्बल अडीच कोटी रुपये या रस्त्यावर खर्च झाले असून नित्कृष्ट कामामुळे शासनाची बदनामी होऊ लागली आहे.
मुरबाड कर्जत या राष्टीय महामार्ग 548 अ वरून वारे येथून कुरुंग आणि पुढे ताडवाडी असा नवीन रस्ता बनविला आहे. त्या ठिकाणी पूर्वी असलेला रस्ता हा साडे तीन मीटर लांबीचा होता आणि त्या भागात अनेक वळणे आहेत. त्याचा परिणाम वाहनचालक यांना समोरुन येणारी वाहने दिसून येत नव्हती. स्थानिक ग्रामस्थांनी हा रस्ता रुंद करावा अशी मागणी केली होती.त्यामुळे स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील वारे कुरुंग ताडवाडी या रस्त्यावरील साडे तीन किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरण हि कामे मंजूर करण्यात आली होती. साडे तीन मीटर लांबीचा रस्ता साडे पाच मीटर लांबीचा करण्यासाठी या रस्त्याच्या दोन्ही बाजूला एक मीटर रुंदीची नवीन रुंदीकरण नव्याने केले गेले. नव्याने रुंदीकरण करताना करताना ठेकेदार कंपनीकडून सार्वजनिक बांधकाम विभागाने तेथे साईड पट्टी खोदून त्यात खडीकरण आणि बीबीएम डांबरीकरण करणे आवश्यक असते.मात्र ठेकेदार कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या गैरहजेरीचा फायदा घेऊन तेथे रुंदीकरण केलेल्या भागात बीबीएम डांबरीकरण करताना लिक्वीड डांबर हे रस्त्याच्या जुन्या डांबरीकरण असलेल्या भागात शिंपडले.आणि त्यावर ग्रीड पसरवून संपुर्ण रस्त्यावर बी बी एम डांबरीकरण केल्याचे भासविण्यात आले. मात्र खोदलेली दोन्ही बाजूची एक मीटर लांबीची साईड पट्टी खोदून त्यात बी बी एम डांबरीकरण केले गेले आहे.
सर्व रस्त्यात बीबीएम डांबरीकरण न करता शासनाचा निधी लाटण्याचा प्रयत्न ठेकेदार करीत असल्याचे स्थानिक सांगत आहेत तेथे रस्त्यावर कार्पेट डांबरीकरण केल्याने अगदी दोन महिन्यात रस्त्याची साईड पट्ट्या हा खचलेल्या दिसून येत आहेत. त्या साईड पट्ट्या या मातीच्या बनलेल्या असल्याने रस्त्याच्या कडेने वाहने गेल्यावर रस्ता टिकाव धरत नाही आणि त्यामुळे या रस्त्याने वाहतूक करणे धोक्याचे बनले आहे.त्यात काही ठिकाणी रस्ता मोठ्या प्रमाणात खचला असल्याने अपघात होण्याची शक्यता अधिक बनली आहे.
या रस्त्यावर याचवर्षी रुंदीकरण केले आहे,त्यामुळे साईड पट्टी खराब होऊ शकते. मात्र नवीन रस्त्याच्या कामामध्ये हि कामे अपेक्षित असते. त्यात नवीन रस्त्यावरील संरक्षण भिंती बनविण्याची कामे नव्याने केली जाणार आहेत. त्यानंतर हा रस्ता सुरक्षित आणि मजबूत होईल.
संजीव वानखेडे — उप अभियंता