स्वा. सैनिकाच्या वृद्ध पत्नीचा पेन्शनसाठी संघर्ष; उच्च न्यायालयात याचिका

। रोहा । जितेंद्र जोशी ।
भारत छोडो आंदोलनात सहभाग घेतल्यामुळे रोह्यातील स्वातंत्र्य सैनिक लक्ष्मण रामचंद्र चव्हाण यांना 17 एप्रिल 1944 ते 11 ऑक्टोबर 1944 या कालावधीत भायखळा कारागृहात कारावास भोगावा लागला होता.पण भायखळा कारागृहात यासंबंधी दस्तऐवज उपलब्ध नसल्याने त्यांच्या विधवा पत्नीला पेन्शन नाकारण्यात आली.याबाबत उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल करण्यात आली असून न्यायालयाने देखील यावरून नाराजी व्यक्त केली आहे.

स्वातंत्र्य सैनिक लक्ष्मण चव्हाण यांनी भारत छोडो आंदोलनात सहभाग घेतल्याबद्दल त्यांना सुमारे सहा महिन्यांचा कारावास भोगावा लागला होता.चव्हाण यांचा 1965 साली मृत्यू झाला.1980 साली राज्य शासनाने स्वातंत्र्य सैनिकांच्या सन्मानार्थ स्वातंत्र्य सैनिक सन्मान पेन्शन योजना सुरू केली. पण चव्हाण यांनी ज्या काळात कारावास भोगला त्या काळातील नोंद कारागृह प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याचे कारण देत चव्हाण यांच्या विधवा पत्नी शालिनी चव्हाण यांना पेन्शन नाकारण्यात आली.

शासन दरबारी वारंवार विनंती अर्ज करून देखील त्यांच्या मागणीची दखल घेण्यात आली नाही. लक्ष्मण चव्हाण यांनी भारत छोडो आंदोलनात सहभाग घेतल्याचे अन्य पुरावे असताना देखील त्यांच्या पत्नीला पेन्शनचा हक्क नाकारण्यात आल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. नव्वद वर्षांच्या शालिनी चव्हाण यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ श्रीकांत रावकर व जितेंद्र पाताडे हे बाजू मांडत आहेत.

Exit mobile version