जीवनगाणे गातच जावे; जिल्हा कारागृहात उमटले सूर

। पनवेल । साहिल रेळेकर ।
छोट्या-मोठ्या गुन्ह्यांमुळे कारावास भोगावा लागणार्‍या कैद्यांसाठी गुरुवारची संध्याकाळी अविस्मरणीय ठरली. निमित्त होते ते जीवनगाणे गातच जावे या अनोख्या कार्यक्रमाचे. अलिबाग जिल्हा कारागृह येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभागातर्फे कारागृह अधीक्षक रामचंद्र रननवरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी (दि.11) कारागृहातील कैद्यांसाठी मनोरंजन व प्रबोधनात्मक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

राज्यातील 36 प्रमुख कारागृहात सांस्कृतिक, प्रबोधनात्मक व समुपदेशनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करून, सांस्कृतिक कार्य संचालनालयाने एक विक्रम केला आहे. जीवन गाणे गातच जावे… या विशेष कार्यक्रमाचे एकाचवेळी कारागृहात आयोजन होण्याची ही घटना देशाच्या व राज्याच्या इतिहासात प्रथमच घडली. व्यावसायिक कलाकारांसोबतच, कारागृहातील कैद्यांनीही या कार्यक्रमात सादरीकरण केले. हेच या कार्यक्रमांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरले. सांस्कृतिक विभागाचे सचिव सौरभ विजय यांच्या मार्गदर्शनाखाली विभीषण चवरे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. कारागृहातील कैद्यांसाठी संपन्न झालेल्या कार्यक्रमात, सांस्कृतिक कार्यक्रम, लोककला, प्रबोधन, समुपदेशन, योग क्रिया याबरोबरच इतर कार्यक्रम ही आयोजित केले होते.

जवळपास एक महिन्यापासून कार्यक्रमाच्या आयोजनासाठी गृह विभागाच्या मदतीने परिपूर्ण नियोजन करण्यात आले होते. अलिबाग जिल्हा कारागृहात निर्माता, दिग्दर्शक अमित घरत यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या बहारदार कार्यक्रमात भावगीते, भक्तिगीते, लोकगीते, कोळीगीते यासह हिंदी, मराठी गीतांच्या सादरीकरणातून कैदी मंत्रमुग्ध झाले. विशेष म्हणजे कार्यक्रमादरम्यान कैद्यांनीही गीत, नृत्याचे सादरीकरण करुन कलागुण सादर केले. या कार्यक्रमाला कलाकारांसह कैद्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी कारागृह अधिक्षक रामचंद्र रननवरे यांनी निर्माता अमित घरत यांचे स्वागत केले.

आयुष्याला नवी दिशा
जाणते आजाणतेपणाने झालेल्या चुकांमुळे, शिक्षा भोगावी लागत असल्याचे काही कैद्यांनी स्पष्ट केले. मात्र या अनोख्या कार्यक्रमामुळे कैद्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळालेली असून, भावी आयुष्यासाठी त्याचा चांगला उपयोग होईल, अशी आशाही अनेकांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे शीर्षक जीवन गाणे गातच जावे…यामुळे ही एक नवी ऊर्जा मिळाली आहे. त्यामुळे जीवनात नवा अध्याय सुरू करणार असल्याची भावनाही काही कैद्यांनी बोलून दाखवली.

कार्यक्रमामुळे कैद्यांच्या मानसिकतेवर सकारात्मक परिणाम होऊन त्यांच्यातील नैराश्य, ताणतणाव दूर होण्यास मदत झाली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात या कार्यक्रमाच्या माध्यमातून खर्‍या अर्थाने एक पर्वणी अनुभवण्यास मिळाली. यावेळी कैद्यांनी अनुभवलेल्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाच्या माध्यमातून निश्‍चितच कैद्यांच्या वर्तनात सुधारणा होण्यास मदत होईल आणि त्यांना सकारात्मक दृष्टिकोन मिळेल.

रामचंद्र रननवरे, अधिक्षक, अलिबाग कारागृह


Exit mobile version