दोन वर्षांनंतर गणेशोत्सवात उत्सवाचे स्वरूप
| पनवेल | वार्ताहर |
कोरोनामुळे गणेशोत्सवावर दोन वर्षे एक प्रकारे निर्बंध लादले गेले होते. मात्र, बाप्पाच्या कृपेने ही महामारी आटोक्यात आली आहे. त्यामुळे रोडपाली येथील वेरोना को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये गणरायांचे आगमन झाले आहे. या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप प्राप्त झाले असून, गणपती बाप्पांसमोर मंगळागौरीचा जागर ठेवण्यात आला होता. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पनवेल परिसरामध्ये नागरीकरण झाले असले तरी पारंपरिक सण आणि उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. मंगळागौरचे अनेक ठिकाणी आयोजन केले जाते.
नोकरी-व्यवसाय करणार्या भगिनी ‘आपले कार्यालय आणि कुटुंब सांभाळा’मध्ये व्यस्त असतात. त्याचबरोबर गृहिणीसुद्धा कौटुंबिक जबाबदार्या पार पाडत असतात. या सर्व गोष्टी करीत असताना आपल्या परंपरा पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांच्या मनामध्ये कमालीची उत्सुकता असते. यानुसार रोडपाली सेक्टर 10 येथील वेरोना को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मध्ये गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. मंडळाचे हे पाचवे वर्ष असून, यावेळी गणरायाचे उत्साहात आणि जोरदार स्वागत करण्यात आले.
गणेशोत्सवानिमित्त सोसायटीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून गणपती बाप्पा समोर मंगळागौरीचा जागर करण्यात आला. पारंपरिक नृत्य अविष्कार सादर करत महिलांनी उपस्थितांना जिंकून घेतले. त्याचबरोबर त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना यानिमित्ताने वाव मिळाला. या कार्यक्रमामध्ये स्त्रीयांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. ग्रामीण भागांत प्रसिद्ध असणार्या मंगळागौर कार्यक्रमाचे प्रथमच कळंबोलीमध्ये आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून स्त्री शक्ती फाऊंडेशनच्या अध्यक्षा विजया कदम प्रमुख उपस्थित होत्या. वेरोना सोसायटीचे सचिव रोहन गायकवाड यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सामाजिक कार्यकर्त्या विजया कदम यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन दीपक गोंधळी यांनी केले. विभा गायकवाड व आर्या कदम यांनी मंगळागौरबद्दल माहिती सांगितली.
महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणाचे धडे
सामाजिक कार्यकर्त्या विजया कदम स्त्री शक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांसाठी विशेष काम करीत आहेत. सावित्रीच्या लेकींना स्वयंमसिद्धाचे धडे देण्यापासून त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत करण्याच्या अनुषंगाने त्यांनी काम केले आहे. गणेशोत्सवानिमित्त वेरोना सोसायटीमध्ये कदम यांनी उपस्थित स्त्रियांना महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणाचे धडे दिले. स्वंरक्षणासाठी सज्ज होण्याचे आवाहन केले. त्याच बरोबर महिला विषयक कायद्याबाबत माहिती देण्यात आली.