बाल्या नृत्यांचे गावागावात होणार सादरीकरण; काळानुसार कलेमध्ये काही प्रमाणात बदल
| रायगड | प्रमोद जाधव |
कोकण प्रांतातून उगम पावणाऱ्या जाखडी तथा बाल्या नृत्यातून पुन्हा घुंगरासह ढोलकीचा नाद घुमणार आहे. दहीहंडी उत्सवासह गणेशोत्सावमध्ये या नृत्यांचे सादरीकरण गावागावात होणार आहे. पारंपारिक असलेली लोककला या कालावधीत अनेक भागात नाचांची घुंगरे निनादू लागणार आहे. त्याचा सराव सुरु झाला आहे.
बाल्या नृत्याकडे पुर्वी मनोरंजन म्हणून पाहिले जात होते. गावातील 30 ते 50 वयोगटातील मंडळी एकत्र येऊन महाभारत, रामायणाच्या कथा कलेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवत होते. हळूहळू या कलेचा विस्तार वाढू लागला. तळ कोकणातून पोलादपूर, महाड, रोहा या दक्षिण रायगडमध्ये बाल्या नृत्य सुरू झाले. 19 व्या शतकात सुरु झालेली ही कला रायगड जिल्ह्यात शहरी भागासह ग्रामीण भागातदेखील वाढली. बाल्या नाचाला कलगीतुरा किंवा शक्ती-तुरा सामना सुरु होऊ लागला.
संगणकीय व मोबाईलच्या जगतामध्ये 2005 नंतर ही कला लोप पावण्याच्या वाटेवर होती. मात्र अलिबागसह रोहा, मुरूड तालुक्यातील अनेक गावांमधील मंडळींनी ही कला जिवंत ठेवण्याचे काम केले. या कलेला आधुनिकतेची जोड देत बदलत्या काळानुसार या कलेमध्ये काही प्रमाणात बदल करण्यात आला. पायात बुट, टी शर्ट, गळ्यात मफलर, टोपी अशा अनेक स्वरुपाचे बदल करून ही कला आधुनिक करण्याचा प्रयत्न केला. दहीहंडी उत्सव आणि गणेशोत्सवात बाल्या नृत्याचे सादरी करण केले जाते.
गाण्यांचा सराव सुरु
शाळकरी मुलांसह महाविद्यालयीन विद्यार्थी, तीस ते चाळीस वर्षावरील मंडळी यांच्या मंडळांमार्फत गाण्यांचा सराव केला जात आहे. त्यामुळे बाल्या नृत्य प्रकार संगणकाच्या युगात आजही गावागावात ज्येष्ठ मंडळींसह तरुणांच्या मनामनात रुजल्याचे चित्र आहे. आज अनेक गावांतील शाळकरी मुलांसह महाविद्यालयातील तरुण मंडळी या नृत्यामध्ये आवडीने सहभाग घेऊन त्याचा आनंद लुटत आहेत.
