| पनवेल | प्रतिनिधी |
तालुक्यातील कर्नाळा पक्षी अभयारण्य येथे बुद्ध पौर्णिमेनिमित्त पार पडलेल्या वन्यजीव नोंदणी मोहिमेत यंदा एक वेगळाच मुद्दा समोर आला आहे. अभयारण्यालगत असलेल्या मुंबई-गोवा महामार्गवरील प्लास्टिक गतिरोधकांवरून वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे निर्माण होणाऱ्या सततच्या आवाजाने वन्यजीवांच्या हालचालींवर परिणाम होत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.
1 मे रोजी झालेल्या या मोहिमेत वन्यजीवांची संख्या सव्वाशेवर पोहोचली असली, तरी या आवाजाचा वन्यजीवांवर होणारा परिणाम चिंतेचा विषय ठरत आहे. राज्यातील पहिले पक्षी अभयारण्य म्हणून ओळख असलेल्या कर्नाळा अभयारण्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही 24 तासांच्या निरीक्षणातून वन्यजीवांची नोंद घेण्यात आली. ज्येष्ठ पक्षी शास्त्रज्ञ डॉ. सलीम अली आणि अरण्यऋषी मारूती चितमपल्ली यांच्यासारख्या वनतज्ज्ञांच्या अभ्यासातून कर्नाळा पक्षी अभयारण्याची आणखी माहिती पक्षीप्रेमींना मिळू शकली. मागील वर्षी 82 वन्यजीवांची नोंद बुद्धपोर्णिमेला झाली होती. यंदा ही संख्या वाढल्याने जैवविविधतेत सकारात्मक वाढ दिसून आली. मात्र, वन्यजीवांच्या नैसर्गिक वर्तनात बदल होत असल्याची नोंद पक्षी निरीक्षकांनी केली आहे.अभयारण्यालगतच्या महामार्गावर बसवलेल्या प्लास्टिक गतिरोधकांमुळे वाहनांचे चाक आपटल्याने होणारा आवाज रात्रभर सुरू असतो. या आवाजामुळे वन्यजीवांच्या विश्रांतीत अडथळा निर्माण होत असल्याचे सांगितले जात आहे. आवाज रोधक यंत्रणा उभारण्यात आली असली, तरी तिचा अपेक्षित परिणाम दिसून येत नसल्याचे निरीक्षकांचे मत आहे.
महामार्गावरील वाहनांच्या आवाजाने वन्यजीवांची पळापळ
