पावसातही स्वातंत्र्यदिनाचा उत्साह कायम

| अलिबाग | वैष्णवी वाडकर |

अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने तालुक्यात पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. गेल्या काही तासांपासून मुसळधार पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. या पावसामुळे तालुक्यातील अनेक रस्ते पाण्याने भरले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. एवढ्या जोरदार पावसात देखील तालुक्यातील स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

शाळा, महाविद्यालयांसह पावसात भिजत ध्वजारोहण, देशभक्तीपर नृत्यांचे सादरीकरण करण्यात आले. त्यामुळे पावसातही स्वातंत्र्यदिनाचा उत्साह कायम दिसून आला. अलिबाग तालुक्यामध्ये भारताचा 79वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा करण्यात आला. अलिबाग शहरात मुख्य ध्वजारोहण सोहळा पोलीस मुख्यालयात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचा हस्ते करण्यात आले. तालुक्यातील रेवदंडा, नागाव, चौल, महाजने, बेलोशी, दिवीवाडी येथील विविध शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायत व शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहणचा कार्यक्रम पार पडला. पावसाच्या सरींमध्ये विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तीपर गीते परेड व भाषणांद्वारे देशाला मानवंदना दिली.

पावसाच्या मुसळधार थेंबांमध्ये फडकणारा तिरंगा आणि त्यासाठी जमलेल्या लोकांचा उत्साह, हा स्वातंत्र्यदिनाचा अविस्मरणीय क्षण ठरला.

Exit mobile version